राज्यात 'शेत तेथे मत्स्यतळे' योजना राबविणार; मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 05:19 PM2023-02-22T17:19:22+5:302023-02-22T17:21:13+5:30

समुद्रात पिंजरा पद्धतीने मत्स्यपालनास प्रोत्साहन देणार

Maharashtra Minister Sudhir Mungantiwar informs about new plan related to fishing business | राज्यात 'शेत तेथे मत्स्यतळे' योजना राबविणार; मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती

राज्यात 'शेत तेथे मत्स्यतळे' योजना राबविणार; मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती

googlenewsNext

मुंबई: राज्यात शेततळे असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेततळ्यात सहजतेने मत्स्यपालन करता यावे यासाठी "शेत तेथे मत्स्यतळे" योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ससून डॉक येथे सागर परिक्रमा कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केली. केंद्रीय मत्स्यपालन मंत्री श्री परषोत्तम रुपाला यांच्या सागर परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्याच्या सांगता सभेत त्यांनी या योजनेचे सूतोवाच केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी या योजनेची संकल्पना मांडली.

सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले की पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी सागरी मासेमारीसोबतच गोड्या पाण्यातील मत्स्यपालनावर भर देण्याचे ठरवले असून त्याकरता विविध योजना सुरू केल्या आहेत. गोड्या पाण्यातील मत्स्यपालनाकरता केंद्रातील मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याच धर्तीवर राज्यानेही गोड्या पाण्यातील मत्स्यपालनावर भर देण्याचे ठरवले असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की आजवर हे क्षेत्र दुर्लक्षित राहिले होते आणि सागरी मासेमारीवरच भर देण्यात आला होता. मात्र गोड्या पाण्यातील मत्स्यपालनाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची क्षमता असून हा व्यवसाय निर्यातक्षम आहे. पंतप्रधान मोदीजींच्या"आत्मनिर्भर भारत" संकल्पनेत मत्स्यपालन क्षेत्राचे योगदान मोठे असणार आहे.

आजवर शेततळ्यात व्यावसायिक मत्स्यपालन करण्यासाठी विविध परवानग्या घेणे आवश्यक होते. मात्र यापुढे त्यात बदल करीत शेतकऱ्याला स्वतःच्या शेततळ्यात मत्स्यपालन करण्यासाठी परवानगीची आवश्यकता लागू नये अशी शासनाची कल्पना असल्याची माहितीही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. 

समुद्रात पिंजर्‍यातील मत्स्यपालनास प्रोत्साहन

आजवर सागरात केवळ मासेमारी चालत आली आहे. सागरी मत्स्य संवर्धन किंवा सागरी मत्स्यपालन या विषयांवर फार भर दिला गेला नव्हता. पारंपारिक मत्स्यव्यवसायात केवळ सागरी मासेमारीवर भर दिला जातो. धरण, तळे, तलाव अशा गोड्या पाण्याच्या जलाशयात मात्र मत्स्यबीज संवर्धन, पिंजऱ्यातील मत्स्यपालन अशा प्रकारे मत्स्यपालन केले जाते. मात्र आता समुद्रातही पिंजरा पद्धतीने मत्स्यपालनास प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाने ठरवले असून लवकरच याविषयातील विस्तृत धोरण जाहिर करण्यात येणार आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Web Title: Maharashtra Minister Sudhir Mungantiwar informs about new plan related to fishing business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.