Maharashtra Minister Portfolios: CM शिंदेंचा दे धक्का; आदित्य ठाकरेंकडे असणाऱ्या पर्यावरण खात्याची जबाबदारी कुणाकडे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 06:09 PM2022-08-14T18:09:43+5:302022-08-14T18:34:01+5:30
Maharashtra Minister Portfolios: आज झालेल्या खाते वाटपात मुख्यमंत्र्यांकडे 10 पेक्षा अधिक खाती, तर फडणवीसांकडे 7 खात्यांचा कार्यभार देण्यात आला आहे.
मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. या विस्तारानंतर खातेवाटपाबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. भाजप स्वतःकडे महत्वाची खाती ठेवणार, हे आधीच बोलले जात होते. झालेही तसेच, भाजपने अनेक महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरेंकडे असलेल पर्यावरण खाते कोणाकडे गेले, याबाबत अनकांना उत्सुकता आहे.
आज झालेल्या खातेवाटपानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे पर्यावरण खाते ठावले आहे. पूर्वी हे खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच आदित्य ठाकरेंनी मुंबईतील आरेमधील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली होती. त्यांच्या या निर्णयाने भाजपला मोठा धक्का मानला जात होता. पण, आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच त्यांनी आरेमध्येच मेट्रो कारशेड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. यातच मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण खाते स्वतःकडे ठेवून आदित्य ठाकरेंना एकप्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडे 10 पेक्षा अधिक खाती
आज झालेल्या खातेवाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभागांची जबाबदारी असणार आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.