अंबादास दानवेंना दिलासा, उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाबाबत महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 03:15 PM2024-07-04T15:15:02+5:302024-07-04T15:16:03+5:30
Ambadas Danve : गुरुवारी अंबादास दानवे यांच्या निलंबनावर विधान परिषदेत चर्चा झाली.
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. अंबादास दानवे यांच्या निलंबनात दोन दिवसांची कपात करण्यात आली आहे. उद्यापासून अंबादास दानवे सभागृहात दिसणार आहेत. गुरुवारी अंबादास दानवे यांच्या निलंबनावर विधान परिषदेत चर्चा झाली.
अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या कारवाई संदर्भात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत प्रस्ताव मांडला. अंबादास दानवे यांच्या निलंबन कालावधीत कपात करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवल्यानंतर सर्वांनी एकमताने मंजूर केला. त्यामुळे आता अंबादास दानवे यांना दिलासा मिळाला असून ते उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून सभागृहात उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोमवारी (१ जुलै) विधान परिषदेत उमटल्याचे पाहायला मिळाले होते. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधींविरोधात सुमोटो प्रस्ताव मांडला तर प्रसाद लाड हेही आक्रमक झाले. यादरम्यान, अंबादास दानवे यांना प्रसाद लाड यांनी हातवारे करत थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंबादास दानवे आक्रमक झाले आणि त्यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली.
विधान परिषदेत प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले होते. तसेच, निलंबनाच्या कालावधीत त्यांना विधान परिषदेच्या परिसरात बंदी घालण्यात आली होती. या निलंबनाच्या कारवाईनंतर अंबादास दानवे यांनी 3 जुलै रोजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहित दिलगिरी व्यक्त केली होती.
अंबादास दानवे काय म्हणाले?
निलंबन कारवाई मागे घेतल्यानंतर अंबादास दानवे म्हणाले, "निलंबन मागे घेण्यात आले. त्याला उशीर झाला. हा निलंबनाचा निर्णय मागे घेऊन खूप काही असं वेगळं त्यांनी केलं असं नाही. मी दिलगिरी व्यक्त केली होतीस त्यानंतर त्यांनी निलंबन मागे घ्यायला हवं होतं. तरी त्यांनी तीन दिवस यामध्ये घेतले. उद्यापासून मी सभागृहात जाईन, तसेही आता चार ते पाच दिवस उरले आहेत. उद्यापासून मी त्याच आक्रमकतेने विरोधी पक्षाची भूमिका मांडत राहणार आहे."