महाराष्ट्र अखंड राहायलाच हवा!

By Admin | Published: August 2, 2016 06:02 AM2016-08-02T06:02:11+5:302016-08-02T06:05:04+5:30

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून आज पुन्हा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला.

Maharashtra must remain intact! | महाराष्ट्र अखंड राहायलाच हवा!

महाराष्ट्र अखंड राहायलाच हवा!

googlenewsNext


मुंबई : स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून आज पुन्हा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. ‘स्वतंत्र विदर्भ राज्य नको. महाराष्ट अखंडच राहायला हवा’, असा ठराव मांडण्याची जोरदार मागणी करीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहातील कामकाज रोखून धरले. तर राज्य निर्मिती हा केंद्र शासनाच्या अख्यत्यारीतील विषय असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत कोणताही प्रस्ताव शासनाकडे नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही.
सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेच्या आमदारांनी ‘अखंड महाराष्ट्र’ अशी अक्षरे असलेल्या टोप्या घालून विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणा सुरू केल्या. सभागृहात अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारण्यापूर्वीच शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांनी संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असा इशारा देत विदर्भ राज्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत केलेल्या वक्तव्याचेही पडसाद सभागृहात उमटले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांनी सरकारने या विषयी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे संतप्त सदस्य वेलमध्ये उतरले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही सदस्य ‘अखंड महाराष्ट्र माझा’ असे लिहिलेले शर्ट घालून आले होते. महाराष्ट्र अखंड राहिलाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी त्यांनी केली. गदारोळामध्ये अध्यक्षांनी कामकाज दोनवेळा तहकूब केले. अखेर अडीच तासांचे कामकाज पुढे ढकलत बाकीचे कामकाज गुंडाळण्यात आले आणि सभागृह दिवसभरासाठी तहकूब झाले.
संयुक्त महाराष्ट्राचा ठराव विधानसभेत झालाच पाहिजे. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून तो उभा राहिला आहे. त्याला कोणी धक्काही लावला तरी ते सहन केले जाणार नाही. - प्रताप सरनाईक, शिवसेना नेते (विशेष प्रतिनिधी)
>राजदंड पळविण्याचा प्रयत्न
शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर धाव घेत तेथील राजदंड उचलला. चोबदाराने त्यांना रोखले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षीरसागर यांना तसे न करण्यास बजावले. तेव्हा कुठे क्षीरसागर यांनी राजदंड सोडला. काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांनी पीठासन अध्यक्ष योगेश सागर यांच्या दिशेने कागदी बोळे फेकले.
अनुशेष दूर करू
केंद्र सरकारने नेमलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाने आपल्या अहवालात विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याबाबत शिफारस केली होती. मात्र, मराठी भाषकांचे एक राज्य व्हावे यासाठी महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन १९५३ मध्ये नागपूर करार केला व त्या अंतर्गत नागपूरला उपराजधानीचा दर्जा देणे, उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे स्थापन करणे, या सर्व प्रदेशाचा एकत्रितपणे सर्वांगीण विकास करणे आणि आवश्यक तेथे अनुशेष दूर करणे या बाबी मान्य केल्या. त्यानुसार
विदर्भाचा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
>तुमची भूमिका काय ते सांगा - मुख्यमंत्री
विदर्भ राज्याची भाजपाची भूमिका आहे आणि शिवसेनेची संयुक्त महाराष्ट्राची भूमिका स्पष्टच आहे. आम्ही ती मान्यही केली आहे. पण तुमचे काय? काँग्रेसला संयुक्त महाराष्ट्र हवाय का? तुमच्याच पक्षाचे माणिकराव ठाकरे बाहेर विदर्भ राज्याची भूमिका मांडतात. संयुक्त महाराष्ट्रावर बोलणारे वळसे पाटील यांचे नेते शरद पवार हे वैदर्भीयांची इच्छा असेल तर आमचा विदर्भ राज्याला पाठिंबा राहील, असे सांगतात. विरोधकांची नेमकी भूमिका काय हे त्यांनी स्वत:च तपासून मग बोलावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावले.
-संयुक्त महाराष्ट्रासाठी स्वत:ला झोकून देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न होत आहेत ही दु:खाची बाब आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ते होऊ देणार नाही. सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर सरकारने विदर्भ राज्य नको, संयुक्त महाराष्ट्रच हवा, असा ठराव मांडला पाहिजे. - राधाकृष्ण विखे पाटील
विधानसभेचे विरोधी पक्षनेते.

Web Title: Maharashtra must remain intact!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.