महाराष्ट्रच माझी जन्मभूमी, कर्मभूमी!
By Admin | Published: April 4, 2016 03:26 AM2016-04-04T03:26:17+5:302016-04-04T03:26:17+5:30
‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ सोहळ्यात बॉलीवूड अभिनेता आमीर खान याने, अभिनेता रणवीर सिंगला प्रश्न विचारून बोलते केले. या वेळी रणवीरनेही संधी साधत खास शैलीत आमीरला उत्तरे दिली
मुंबई : ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ सोहळ्यात बॉलीवूड अभिनेता आमीर खान याने, अभिनेता रणवीर सिंगला प्रश्न विचारून बोलते केले. या वेळी रणवीरनेही संधी साधत खास शैलीत आमीरला उत्तरे दिली. या वेळी पहिल्यांदाच आमीर-रणवीर यांनी एकत्र स्टेज शेअर केला, त्यामुळे उपस्थितांसाठी ही एक पर्वणीच ठरली.
तुझं बालपण कसं होतं?
वांद्रे येथील पंखावाडी येथे माझे बालपण गेले आहे. व्यावसायिक कुटुंबात राहत होतो. बाबा उद्योजक होते, पण मला मात्र, त्या क्षेत्रात जायचे नव्हते. कॉलेजमध्ये सगळ्या अॅक्टिव्हिटीज्मध्ये मी सहभागी व्हायचो. त्यामुळे अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती.
फिल्म इंडस्ट्रीचा तुझ्या प्रवास कसा सुरू झाला?
लहानपणापासूनच अमिताभ बच्चन, आमीर खान यांच्यासारख्या दिग्गजांचे सिनेमे पाहायचो. आमीर खान यांचा एकही सिनेमा मी मिस केलेला नाही. शिवाय, आगामी ‘दंगल’ सिनेमासाठी मी उत्सुक आहे. त्यामुळे ‘दंगल’साठी तुम्ही केलेला लूक, शारीरिक मेहनतदेखील प्रशंसनीय आहे. एखाद्या व्यक्तिरेखेसाठी ज्या पद्धतीने तुम्ही मेहनत घेता, त्यातून प्रेरणा मिळते. प्रत्येकाला वाटत असते की, मी अमिताभ बच्चन व्हावे, परंतु बऱ्याचदा त्यांना जे आवडते, ते करायची संधी मात्र मिळत नाही. मला ती संधी मिळाली आहे, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मला जे आवडते, ते मी करतोय.
तू इतका स्वच्छंद जगतोस, त्याचं गुपित काय?
मला कोणीतरी पारखतेय याची भीती किंवा दडपण कधीच बाळगत नाही. त्यामुळे मला जे वाटते, ते मी करतो. मी ज्यात कम्फर्ट असतो, त्या गोष्टीबद्दल समोरची व्यक्ती काय विचार करेल, याचा विचार करत नाही.
तू नेहमीच ‘फुल आॅफ एनर्जी’ कसा असतोस?
आजचा दिवस शेवटचा आहे, अस समजून मी मन भरून तो दिवस जगतो. उद्या काय होईल? उद्याचा दिवस कसा असेल? या सगळ्याचा विचारच करत नाही. प्रत्येक दिवसाचा क्षण अन् क्षण जगायचा, हे माझं पक्क असतं. ‘अब में सब डालता हूँ’ त्यामुळे जगणं सोप्प होतं, कायम आनंदीही असतो.
‘बाजीराव-मस्तानी’साठी मराठी भाषा कोणी शिकविली?
‘बाजीराव’ या मराठमोळ्या योद्ध्याच्या व्यक्तिरेखेसाठी मराठी भाषा शिकण्यास मी उत्सुक होतो. यासाठी मी यूट्युबवर महाराष्ट्रीयन राजकीय नेत्यांची हिंदी भाषेतील भाषणे ऐकायचो. त्या वेळी मोबाइलमध्ये आणि गाडीमध्ये सतत मी भाषणे ऐकायचो. त्यातून सतत उच्चार शिकत होतो. हळूहळू हे उच्चार माझ्या लक्षात येऊ लागले. ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमातील ‘चला साताऱ्याला’ या संवादाबद्दल महाराष्ट्रीयन मित्रपरिवाराकडून कौतुकाची थाप मिळाली. आजही महाराष्ट्रीयन मित्रपरिवारापैकी कोणी भेटले की, या संवादाची आठवण काढत ‘एकदम अचूक पंच आहे संवादात’ असे म्हणत, संवाद बोलण्याचा आग्रह करतात.
आमीरने बाजीराव
पाहिला नाही...
‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. शिवाय, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांनाही अनेक पुरस्कार मिळालेत. मात्र, तरीही अजून ‘आमीर खानने हा चित्रपट पाहिला नाही,’ अशी खंत रणवीरने व्यक्त केली. त्याला उत्तर देत, ‘सब्र का फल मिठा होता है’ असे म्हटले.
...अन् माझे बाबांशी नाते बदलले
आमीर खान यांचा ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट मी आणि माझ्या बाबांनी एकत्र पाहिला आणि त्यानंतर आमचे नाते बदलले. आमीर खान याच्या चित्रपटांमध्ये समाजात बदल घडविण्याची ताकद असल्याचेही रणवीरने आवर्जून सांगितले.
पुरस्कार सोहळ्यात ‘आमीर’ प्रथमच
‘पहिल्यांदाच आमीर खान यांना पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असल्याचे पाहतोय. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग असून, माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे,’ असे म्हणून रणवीरने ‘पुरस्कार’ सोहळ्यातील आमीर खानची उपस्थिती अधोरेखित केली.