महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील गुन्हा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:38 AM2017-07-19T03:38:43+5:302017-07-19T03:38:43+5:30
आझाद मैदान दंगल प्रकरणाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांची परवानगी नसतानाही गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढला.
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आझाद मैदान दंगल प्रकरणाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांची परवानगी नसतानाही गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढला. या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेला गुन्हा उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केला. या प्रकरणी सहा महिन्यांत दोषारोपपत्र दाखल करणे कायद्याने बंधनकारक असताना पोलिसांनी अद्याप ते दाखल केले नाही. त्यामुळे न्या. रणजीत मोरे व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने राज ठाकरे व त्यांच्या कार्यर्त्यांवरील गुन्हा रद्द केला.
सदर गुन्हा रद्द करण्यासाठी कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ‘अशा गुन्ह्यांत सहा महिन्यांत आरोपपत्र दाखल करणे आवश्यक आहे. मात्र पोलिसांनी सहा महिन्यांत आरोपपत्र दाखल केले नाही. तसेच ज्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे, त्याच कलमांतर्गत दंड ठोठावून गुन्हेगारांना सोडण्याची तरतूद आहे. आरोपपत्र दाखल करण्यास विलंब झाल्याने गुन्हा रद्द करण्यात यावा,’ अशी विनंती मनसेचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी न्यायालयाला केली.
उच्च न्यायालयाने शिरोडकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत मनसे कार्यकर्त्यांवरील गुन्हा रद्द केला. राज ठाकरे यांनी जरी गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला नसला तरी त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने संपूर्ण केसच रद्द केल्याने राज ठाकरेंना पुढे ही केस लढवण्याची आवश्यकता नाही.