मनसेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 09:41 PM2021-03-25T21:41:14+5:302021-03-25T21:43:41+5:30
Raju Patil : संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं राजू पाटील यांचं आवाहन
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ही चिंताजनक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत. तसंच सरकारकडूनही सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली. तसंच संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
"गेले वर्षभर कोरोनासोबत लपंडाव खेळत होतो. पण तुर्तास कोरोनाच्या तावडीत सापडलोच. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास कोरोना चाचणी करावी. कोरोना बरा होतो. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन," अशा आशयाचं ट्वीट राजू पाटील यांनी केलं आहे.
गेले वर्षभर कोरोनासोबत लपंडाव खेळत होतो, पण तुर्तास कोरोनाच्या तावडीत सापडलोच ! गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास चाचणी करावी. कोरोना बरा होतो. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन.
— Raju Patil (@rajupatilmanase) March 25, 2021
राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद
कोरोना विषाणूची महासाथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बुधवारी राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात बुधवारपेक्षाही अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत राज्यात आजवरची सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत राज्यात ३५ हजार ९५२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दुसरीकडे थोडी दिलासादायक बाब म्हणजे २० हजार ४४४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
राज्यात आतापर्यंत २६ लाख ८३३ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत २२ लाख ८३ हजार ०३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या २ लाख ६२ हजार ६८५ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ५३ हजार ७५९ मृत्यूंची नोंद झाली.