लोकसभेचं काही ठरेना, पण राज ठाकरे पुन्हा घेणार मेळावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 06:34 PM2019-03-13T18:34:48+5:302019-03-13T18:39:22+5:30
मनसेच्या १३व्या वर्धापनदिनी - ९ मार्चला राज ठाकरेंचं भाषण झालं होतं. त्यात, फक्त आणि फक्त केंद्रातील मोदी सरकारवर त्यांनी शरसंधान केलं होतं.
आचारसंहिता जाहीर झाल्यावर पुन्हा भेटू, असं सांगून पक्षाच्या वर्धापनदिनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत कुठलीही भूमिका जाहीर न करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अजूनही लोकसभेबाबत संभ्रमातच असल्याचं समजतं. परंतु, पुढच्या आठवड्यात ते पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधणार असल्याचं कळतं. २० मार्चचा मुहूर्त या मेळाव्यासाठी ठरवण्यात आल्याचं कळतंय. त्यावेळी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळही फुटणार का, याबद्दल अनिश्चितताच आहे.
मनसेच्या १३व्या वर्धापनदिनी - ९ मार्चला राज ठाकरेंचं भाषण झालं होतं. त्यात, फक्त आणि फक्त केंद्रातील मोदी सरकारवर त्यांनी शरसंधान केलं होतं. पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक, अजित डोवाल यांची भूमिका, याबद्दल संशय व्यक्त करत, पुलवामासारखा आणखी एक हल्ला निवडणुकीदरम्यान घडवला जाऊ शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. मोदींचे फोटो, काही बातम्या, काही विधानांचे व्हिडीओ स्क्रीनवर दाखवून त्यांनी टीकेचे बाण सोडले होते.
वास्तविक, मनसे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, किती जागा लढवणार, कुठे लढणार, याबद्दल राज ठाकरे काय बोलतात, याबद्दल त्यांच्या शिलेदारांना आणि राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. परंतु, विचार सुरू आहे, निवडणूक जाहीर झाल्यावर भेटू - बोलू, देशाच्या हिताचीच भूमिका घेऊ, एवढंच त्यांनी सांगितलं होतं.
कुठल्याही पक्षाला प्रस्ताव दिलेला नाही, 'दोन देतो का, तीन देतो का', करायला मी काही प्रकाश आंबेडकर नाही, असा टोला लगावत, मनसेचं इंजिन आघाडीला जोडलं जाण्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली होती. त्यामुळे राज पुन्हा स्वबळाचा नारा देणार का आणि लोकसभेला कसे सामोरे जाणार, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. इतर सर्व पक्षांनी आपापल्या भूमिका जवळजवळ स्पष्ट केल्यात. परंतु, राज यांचं काहीच ठरत नाहीए.
या पार्श्वभूमीवर, मनसेची ताकद राज्यात दिसेल, या शरद पवारांच्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मात्र, कृष्णकुंजवर लोकसभेचं गणित जमत नसल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं. त्याचवेळी, मोदी सरकारचा फोलपणा दाखवण्यासाठी राज आणखी एक मेळावा घेणार असल्याचं समजलं. लोकसभेत मनसे आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी उतरेल, पण विधानसभा हे आमचं मुख्य लक्ष्य आहे, असं या सूत्राने सांगितलं. म्हणजे, पवारांचा अंदाज बहुधा विधानसभेच्या संबंधात असावा, वेगळी राजकीय गणितं त्यांच्या डोक्यात असावीत, असेच संकेत मिळताहेत. अर्थात, वर्धापनदिनाच्या 'राजकीय स्ट्राईक'नंतर आता राज मोदींवर कोणता नवा तोफगोळा फेकणार, हे पाहावं लागेल.