CoronaVirus महाराष्ट्र तिसऱ्या टप्प्यात नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 06:00 AM2020-04-09T06:00:12+5:302020-04-09T06:00:36+5:30
राजेश टोपे : इतर देशांच्या तुलनेने भारतात कोरोनाचा फैलाव कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे जगाच्या तुलनेने भारतात रूग्णसंख्या वाढीचा आलेख हा कमी आहे. ही एक समाधानाची बाब असून, महिनाभरामध्ये प्रगत अमेरिकेचा विचार केल्यास तेथे एक लाख २१ हजार रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र अजून करोनाच्या तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही. त्यामुळे येत्या काळात आपण अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी हाच एक सक्षम पर्याय असल्याचा पुनरूच्चार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला.
बुधवारी टोपे यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे जालना येथील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एकूणच राज्याची आणि देशाची स्थिती त्यांनी विशद केली. परदेशातील प्रगत देशांमध्ये मोडले जाणारे अमेरिका, जपान, आॅस्ट्रेलिया आदी देशांमध्ये रूग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. ८ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत भारतात केवळ ४५०० रूग्ण आढळले. तर हेच प्रमाण अमेरिकेत चक्क १ लाख २१ हजारावर असल्याचे त्यांनी नमूद केले. आॅस्ट्रेलिया, जपान यांनी तीन- तीन महिन्यांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्या तुलनेने आपल्याकडे २१ दिवस हे कमीच पडतात. भविष्यात यात वाढीबद्दल केंद्र सरकार जो निर्णय घेईल, तोच राज्यालाही घ्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रॅपिड टेस्ट वाढविणार
कोरोना संदर्भात रॅपिड टेस्ट वाढविण्यासंदर्भात लवकरच निर्णय होणार आहे. या टेस्ट जरी गतीने मिळत असल्या तरी त्यातील विश्वासाहर्ता ही ५० टक्केच असते. ही विश्वासाहार्ता आणखी वाढविण्यासह या टेस्टची संख्याही लवकरच वाढविण्यासंदर्भात मंत्रिमंडळाचा निर्णय होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचा फैलाव होणार नाही, यासाठी सर्व ते कठोर निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आपण स्वत: घेत आहोत.