सौरपंप बसविण्यात महाराष्ट्र नंबर वन; राज्यात ७१ हजार ९५८ पंप केले स्थापित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 07:18 AM2023-11-11T07:18:12+5:302023-11-11T07:22:09+5:30
योजनेत राज्यांना ९ लाख ४६ हजार ४७१ सौरपंप बसविण्यासाठी मान्यता आहे. देशात यापैकी २ लाख ७२ हजार ९१६ सौरपंप स्थापित झाले आहेत.
मुंबई : शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे, यासाठी सौर कृषीपंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली असून, आजपर्यंत ७१ हजार ९५८ सौरपंप स्थापित केले आहेत.
केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ‘किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियान’ म्हणजेच ‘कुसुम’ ही योजना २०१९ ते २०२३ या कालावधीसाठी राबवत आहे. योजनेत राज्यांना ९ लाख ४६ हजार ४७१ सौरपंप बसविण्यासाठी मान्यता आहे. देशात यापैकी २ लाख ७२ हजार ९१६ सौरपंप स्थापित झाले आहेत. महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांत महाराष्ट्र आघाडीवर आहे.
आस्थापनेसाठी मान्यता
नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्रातील महाऊर्जास एकूण २ लाख २५ हजार सौरपंप आस्थापनेस मान्यता दिली. यापैकी राज्य शासनाने महावितरण कंपनीस त्यांच्याकडील पेड पेंडिंगच्या पुढील १ लाख सौरपंप आस्थापनेसाठी मान्यता दिली. त्यामुळे महावितरणकडे कृषीपंप जोडणीसाठी अर्ज केलेल्या मात्र अनामत रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना आता सौर कृषीपंप देण्यात येणार आहे. महाऊर्जाकडे उर्वरित १ लाख २५ हजार सौरपंपाचे उद्दिष्ट अनुसरून शेतकऱ्यांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत.
अशी आहे स्थिती
८,७४,९७ राज्यात
शेतकऱ्यांकडून प्राप्त अर्ज
१,०४,८२३ जणांना देण्यात
आली मान्यता
९४,९१९ जणांना पाठविण्यात
आले एसएमएस
८३,४८० शेतकऱ्यांनी भरला लाभार्थी हिस्सा
७१,९५८ सौरपंप झाले स्थापित
१,८०,००० सौरपंपांच्या अधिक उद्दिष्टाची ‘महाऊर्जा’ने ११ सप्टेंबरला केंद्र शासनाकडे केली मागणी.