महाराष्ट्र पुन्हा एकवार गारठला; बहुतांश शहरांत तापमान १0 अंशाखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 05:01 AM2020-01-31T05:01:58+5:302020-01-31T05:05:01+5:30
उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणांचे किमान तापमान १0 अंशांच्या खाली नोंदविण्यात आले.
मुंबई : थंडीने पुन्हा एकवार महाराष्ट्र गारठला असून, गुरुवारी सर्वात कमी किमान तापमान नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे (६ अंश) होते, तर मुंबईचे तापमानही १३.६ वर आले. तीन ते चार दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणांचे किमान तापमान खाली घसरले आहे. गेल्या ४८ तासांत किमान तापमान खाली घसरण्याचा वेग वाढला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणांचे किमान तापमान १0 अंशांच्या खाली नोंदविण्यात आले. पुढील २४ तासांत किमान तापमानाचा पारा खालीच राहील. त्यानंतर मात्र किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे.
हंगामातली अखेरची थंडी
उत्तरेकडून वाहत असलेल्या शीत लहरींमुळे महाराष्ट्र आणि गुजरात गारठला आहे. उत्तरेकडील थंड वारे आणखी दोन ते तीन दिवस वाहतील. परिणामी किमान तापमान सामान्यापेक्षा कमी राहील. मात्र आता वाऱ्याची दिशा बदलणार आहे. २ फेब्रुवारीनंतर उत्तरेऐवजी दक्षिण/आग्नेय दिशेने वारे वाहतील. हे वारे रायलसीमा आणि अंतर्गत कर्नाटक येथून वाहत येथे येतात. तेथे तापमान आधीच जास्त आहे. हे दमट वारे मुंबईतील तापमानात वाढ करू शकतात. परिणामी हे वारे या हिवाळ्याच्या हंगामाचा शेवट करणारे ठरतील.
३१ जानेवारी - संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
१ फेब्रुवारी : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
२ फेब्रुवारी : संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
३ फेब्रुवारी : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.