मोठा उलटफेर! आज लोकसभा निवडणूक झाली तर...; टाईम्स नाऊ-मॅट्रीझचा महाराष्ट्रासह देशात सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 11:32 PM2024-02-07T23:32:34+5:302024-02-07T23:33:31+5:30
Maharashtra Opinion poll 2024 Loksabha election Latest: अजुन बरीच समीकरणे बाकी आहेत. परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आलेल्या या ओपिअन पोलमध्ये NDA काँग्रेस आघाडीच्या हातचा मोठा विजय हिसकावून घेण्याच्या परिस्थितीत आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच लोकसभेत भाजपा ३७० जागा आणि एनडीए ३० जागा जिंकणार असल्याचा दावा छातीठोकपणे केला होता. भाजपाने ज्या राज्यांत ताकद कमी पडत होती तिथे साम, दाम, दंड, भेद वापरून फोडाफोडी केली आहे. महाराष्ट्र, बिहार ही त्याची ताजी उदाहरणे आहेत. अशातच टाईम्स नाऊ-मॅट्रीझचा महाराष्ट्रासह देशात सर्व्हेचा ओपिनिअन पोल आला आहे. यामध्ये ज्या राज्यांत भाजपाला फटका बसताना दिसत होता, तिथे पारडे पालटल्याचे दिसत आहे.
हा नवा सर्व्हे वाचा... आज लोकसभा निवडणूक झाली तर...; आजतक-सीव्होटरचा दुसरा सर्व्हे, मोदी खरेच ३७०+
अजुन बरीच समीकरणे बाकी आहेत. परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आलेल्या या ओपिअन पोलमध्ये एनडीएला ३६६ जागा मिळताना दिसत आहेत. तर इंडिया आघाडीला काँग्रेससह 106 जागा मिळताना दिसत आहेत. अन्य पक्षांच्या खात्यात 73 जागा जाताना दिसत आहेत.
नितीशकुमारांच्या बिहारमध्ये एनडीए: 35, I.N.D.I.A: 5 जागा मिळताना दिसत आहेत. नितीशकुमार भाजपात आल्याने परिस्थिती बदलली आहे. उत्तराखंड भाजपाला पाचपैकी पाच, मध्य प्रदेशमध्ये एनडीएला २९ पैकी 28 आणि काँग्रेसला १ जागा मिळताना दिसत आहे.
हिमाचल प्रदेश भाजपाला ४ पैकी ३ जागा तर काँग्रेसला १ जागा मिळताना दिसत आहे. दिल्लीमध्ये भाजपाला ७ पैकी सात जागा मिळताना दिसत आहेत. पंजाबमध्ये १३ पैकी आप ०५, भाजप ०३, काँग्रेस ०३, SAD 01 जागा मिळताना दिसत आहे. हरियाणामध्ये भाजपाला १० पैकी ९ जागा, राजस्थानमध्ये २५ पैकी २५ जागा, गुजरातमध्ये २६ पैकी २६ जागा मिळताना दिसत आहेत.
छत्तीसगडमध्ये भाजपाला ११ पैकी ११ जागा मिळतान दिसत आहेत. झारखंडमध्ये भाजपाला १४ पैकी १३ जागा मिळताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी तृणमुलला TMC: 26, भाजप : १५, काँग्रेस + डावीकडे: १ जागा मिळताना दिसत आहे. तामिळनाडू ३९ पैकी I.N.D.I.A: 36, - AIADMK: 2 आणि भाजपाला १ जागा दिसत आहे.
महाराष्ट्रात काय परिस्थिती...
महाराष्ट्रामध्ये एनडीए मोठा उलटफेर करताना दिसत आहे. लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी भाजपा-अजित पवार राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ३९ जागा मिळताना दिसत आहे. तर उद्धव ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ९ जागा मिळताना दिसत आहेत. या दोन्ही आघाडी-युतींच्या जागावाटपाचे फॉर्म्युले अद्याप ठरायचे आहेत. तसेच मविआमध्ये आंबेडकर तर एनडीएमध्ये मनसेची एन्ट्री होणार का, हे ठरायचं आहे . तरी काही महिन्यांपूर्वीच्या ओपिनिअन पोलमध्ये एनडीएला 19 ते 21 जागा आणि मविआला 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.