महाराष्ट्रात पेट्रोल पुन्हा शंभरीपार, पेट्रोल-डिझेलच्या दरांनी गाठला नवा उच्चांक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:06 AM2021-05-11T06:06:06+5:302021-05-11T06:10:44+5:30
सरकारी तेल वितरण कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात २६ पैशांची, तर डिझेलच्या दरात ३३ पैशांची वाढ केली आहे. पाच राज्ये-केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीच्या काळात इंधन दरवाढ रोखून धरण्यात आली होती.
नवी दिल्ली : आठवडाभरात पाचव्यांदा झालेल्या दरवाढीनंतर सोमवारी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत. राजस्थान आणि मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रातही आता पेट्रोल १०० रुपये लिटरच्या वर गेले आहे.
सरकारी तेल वितरण कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात २६ पैशांची, तर डिझेलच्या दरात ३३ पैशांची वाढ केली आहे. पाच राज्ये-केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीच्या काळात इंधन दरवाढ रोखून धरण्यात आली होती. ४ मे रोजी ती पुन्हा सुरू करण्यात आली होती. तेव्हापासूनची ही पाचवी दरवाढ ठरली आहे.
नव्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ९१.५३ रुपये लिटर, तर डिझेल ८२.०६ रुपये लिटर झाले आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशातील काही ठिकाणी पेट्रोल काही दिवसांपूर्वीच १०० रुपयांच्या वर गेले होते. सोमवारी महाराष्ट्रातील परभणीत शहरातही शंभरी पार करून पेट्रोल १००.२० रुपये लिटर झाले. मुंबईत पेट्रोल वाढून ९७.८६ रुपये लिटर तर डिझेल ८९.१७ रुपये लिटर झाले. भोपाळमध्ये ९९.५५ रुपये दरासह पेट्रोल शंभरीच्या
उंबरठ्यावर आहे. राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल १०२.४२ रुपये लिटर आणि मध्यप्रदेशातील अनुपपूर येथे १०२.१२ रुपये लिटर झाले आहे.
वेळोवेळी दरवाढ
देशात पेट्रोल १०० रुपयांच्या वर जाण्याची ही दुसरी वेळ आहे. मागील पाच दरवाढींत पेट्रोल १.१४ रुपयांनी, तर डिझेल १.३३ रुपयांनी महागले आहे. मागच्या वर्षी मार्चमध्ये सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात मोठी वाढ केली होती. या करवाढीनंतर सरकारी तेल वितरण कंपन्यांनीही वेळोवेळी दरवाढ करून पेट्रोल २१.५३ रुपयांनी, तर डिझेल १९.१८ रुपयांनी महाग केले.