कारागृह अधिकारी, रक्षकांचा आहार भत्ता वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 05:46 AM2018-05-28T05:46:35+5:302018-05-28T05:46:35+5:30
विविध गुन्ह्यांतील दोषी आणि न्यायाधीन खटल्यातील हजारो संशयितांच्या सुरक्षिततेमध्ये व्यस्त असलेल्या राज्यभरातील विविध कारागृहातील अधिकारी व अंमलदारासाठी एक खूशखबर आहे.
- जमीर काझी
मुंबई - विविध गुन्ह्यांतील दोषी आणि न्यायाधीन खटल्यातील हजारो संशयितांच्या सुरक्षिततेमध्ये व्यस्त असलेल्या राज्यभरातील विविध कारागृहातील अधिकारी व अंमलदारासाठी एक खूशखबर आहे. आहार भत्त्यासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये आता तब्बल एका तपानंतर वाढ करण्यात आली आहे. आता तुरुंग अधिकारी व रक्षकांना प्रत्येक महिन्याला अनुक्रमे १ हजार ५०० व १ हजार ३५० रुपये दिले जाणार आहेत. कारागृह प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या आहार भत्त्याच्या वाढीला गृहविभागाने अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. सुधारित दराचा लाभ जानेवारी महिन्यापासून दिला जाणार असल्याचे गृहविभागातील वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
२००६ पासून तुरुंगाधिकारी व रक्षकांना प्रति दिवस अनुक्रमे ३६ व ३० रुपये दिले जात होते. आता सरकारने त्यामध्ये सरासरी १५ रुपयांनी वाढ केल्याने संबंधितांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील विविध मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांत गेल्या काही महिन्यांत कैद्यांमध्ये मारहाण, पलायनाच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये मुंबईतील भायखळा कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये हिची कारागृह रक्षकाकडून झालेली अमानुष हत्या ही त्यातील क्रुरतेचा कळस होता. त्याबाबत सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त झाल्यानंतर, सुरक्षा व्यवस्थेमध्ये विविध स्तरावर सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. जेलमधील बंदिवानांची वाढती संख्या आणि त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवण्याच्या कामाचा वाढता ताण प्रामुख्याने तुरुंग अधिकारी, सुभेदार, हवालदार रक्षकांवर पडला होता. त्यामुळे अनेकदा १२ तास व त्याहून अधिक वेळ ड्युटी करावी लागत आहे.
एकीकडे तुटपुंजे आहार वेतन असताना, वाढत्या बंदोबस्तामुळे रक्षकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने, त्यात वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर कारागृह प्रशासनाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आहार भत्ता वाढविण्याचा प्रस्ताव गृहविभागाला सादर केला होता. कारागृह विभागाचे महासंचालक बिपीन बिहारी यांनी त्याबाबत केलेल्या पाठपुराव्यानंतर सरकारने त्याला मान्यता दिली. सुधारित दरानुसार तुरुंग अधिकारी श्रेणी-१ व श्रेणी-२ च्यासाठी दिवसाला ५० रुपये आणि सुभेदार, हवालदार व रक्षकांसाठी दिवसाला ४५ रुपये म्हणजेच, महिन्याला अनुक्रमे १,५०० व १,३५० रुपये दिले जाणार आहेत.
६५० अधिकारी, कर्मचारी
राज्यात सध्या विविध प्रकारची एकूण २२५ कारागृहे आहेत. त्यात ९ मध्यवर्ती, तर ३१ जिल्हा कारागृहे, तसेच १३ खुली कारागृहे, १ खुली वसाहत आणि १७२ उप-कारागृहांचा समावेश आहे. या ठिकाणी दोषी व कच्च्या कैद्यांची संख्या एकूण ३२ हजार ४५१ इतकी आहे. त्यात जवळपास ७२ टक्के म्हणजे २३ हजार ७०५ कैदी हे न्यायाधीन खटल्यातील आहेत. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी गणवेशधारी ६५० वर अधिकारी आणि तीन हजारांवर सुभेदार, रक्षक कार्यरत आहेत.
जानेवारीपासून होणार वाढ लागू
कारागृहातील गणवेशधारी तुरुंगाधिकारी व अंमलदारांच्या आहार भत्त्याचे दर हे बारा वर्षांपासून कायम होते. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यापासून ही वाढ लागू होईल. जेलच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना राबविताना, अधिकारी, रक्षकांच्या अडचणी, समस्याही सोडविल्या जात आहेत.
- बिपीन बिहारी, पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा.