Maharashtra Political Crisis: मोठी अपडेट: कोश्यारी आपल्याकडेच चार्ज ठेवणार; एकनाथ शिंदेना मुंबईलाच यावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 10:28 AM2022-06-22T10:28:24+5:302022-06-22T10:28:50+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, उपचारांसाठी त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झालेला असतानाच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने पुढे काय, असे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कोश्यारी यांना रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे त्यांचा चार्ज गोव्याच्या राज्यपालांकडे देण्यात येणार असल्याचे वृत्त होते. परंतू, राज्यपाल कार्यालयाने कोणाकडेही चार्ज दिला जाणार नसल्याचे म्हटले आहे.
गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे व पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आहेत. ही संख्या ४० असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. तसेच गटनेते पदाचा दावा करण्यासाठी शिंदे गोव्याला जाण्याची शक्यता होती. गेल्या अर्ध्या तासापासून या आमदारांची बैठक सुरु आहे. या बैठकीत गटनेता ठरविला जाणार आहे. तसेच त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी शिंदे स्वत: राज्यपालांना भेटण्यास जाण्याची शक्यता आहे.
राज्यपाल भवनाने कोश्यारींचा चार्ज आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या राज्यापालांकडे चार्ज दिला जाणार नाही, असे राज्यपाल भवनाकडून स्पष्ट करण्यात आहे. राज्यपाल व्हिडीओ कॉ़न्फरन्सींगद्वारे उपलब्ध असतील असे म्हटले आहे. यामुळे शिंदे यांना राज्यपाल भवनात यावे लागणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, उपचारांसाठी त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यपालांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यपाल कोश्यारींना काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे.