Maharashtra Political Crisis: ठाकरेंचे दूत पोहोचण्याआधीच भाजप आमदार सुरतमध्ये; एकनाथ शिंदेंशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 02:58 PM2022-06-21T14:58:11+5:302022-06-21T14:58:47+5:30
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सूरतला येऊन एकनाथ शिंदे आणि आमदारांची भेट घेण्याची शक्यता आहे.
बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार सुरतमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेलमध्ये चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले दोन दूत सुरतला पाठविले आहेत. मात्र, ते पोहोचण्याआधीच भाजपाच्या आमदारांनी आतमध्ये एन्ट्री केली आहे.
भाजपाचे आमदार संजय कुटे हे नुकतेच एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदार थांबलेल्या ली मेरीडिअन हॉटेलमध्ये गेले आहेत. सुरुवातीला पोलिसांनी त्यांची कार हॉटेलच्या बाहेरच रस्त्यावर थांबविली होती. आत पाठविले जात नव्हते, यानंतर फोनाफोनी झाली आणि कुटे यांना आतमध्ये पाठविण्यात आले आहे. अद्याप शिवसेनेचे रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर तिथे पोहोचलेले नाहीत. या दोघांना आतमध्ये जाऊ दिले जातेय का? हे लवकरच समजणार आहे.
महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सूरतला येऊन एकनाथ शिंदे आणि आमदारांची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी भाजपाने या हॉटेलशेजारील एक फार्महाऊस देखील बुक केल्याचे समजते आहे. हे फार्महाऊस मंगलप्रात लोढा यांच्या नावावर बुक करण्यात आले आहे.
दरम्यान, संजय कुटे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे समजते.