नारायण राणेंची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली; २ महिन्यात सगळी चक्रे फिरली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:32 AM2022-06-30T11:32:09+5:302022-06-30T11:32:50+5:30
जूनच्या सुरूवातीला राज्यसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पक्षाची मते दाखवूनही अपक्ष, घटक पक्षांच्या जीवावर भाजपाने तिसरा उमेदवार निवडून आणण्यास यश मिळवलं.
मुंबई - राज्याच्या राजकारणात २९ जूनचा दिवस राजकीय भूकंप घडवणारा ठरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे जात राजीनामा सादर केला. ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे भाजपाच्या गोटात आनंद पसरला आहे. पुन्हा एकदा राज्यात भाजपाची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. महाविकास आघाडी सरकार २५ वर्ष टिकेल असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत करत राहिले पण हे सरकार केवळ २.५ वर्षातच पडले अशी चर्चा सुरू झाली आहे.
त्यातच मागील अनेक महिन्यांपासून भाजपा नेते सरकार पडण्याची डेडलाईन देत होते. अनेकदा भाजपा नेत्यांची खिल्ली उडवण्यात आली. त्यात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अलीकडेच १९ एप्रिल रोजी एक विधान करत मविआ सरकार पडण्याची डेडलाईनची सांगितले. नारायण राणे म्हणाले होते की, आमच्याकडे कोकणात मे अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक वादळे येतात. या वादळांत डुलणारी झाडे फांद्यांसकट मोडून पडतात. राज्यातही तीन पक्षांचे एक झाड आहे, त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री बसले आहेत. ते खोडावर बसले नाही, यामुळे जूनपूर्वीच ते मुख्यमंत्री पदावरून बाजूला होतील, असे वक्तव्य राणे यांनी केले होते.
त्यामुळे राणेंची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आहे. मे महिन्याच्या अखेरीस राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांबाबत चर्चा सुरू झाली. या निवडणुकीत भाजपाने संख्याबळ नसतानाही अतिरिक्त उमेदवार उभे केले. निवडणुकीत दगाफटका बसण्याची शक्यता लक्षात घेता या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मविआचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. या निवडणुकीत राज्यसभेचा उमेदवार मागे घ्या, विधान परिषदेत ५ उमेदवार उभा करा असा प्रस्ताव या नेत्यांनी दिला. परंतु तोच प्रस्ताव फडणवीसांनी मविआ नेत्यांना दिला. तुम्ही भाजपाचा तिसरा उमेदवार राज्यसभेत पाठवून द्या, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. त्याबदल्यात भाजपा विधान परिषदेत पाचवा उमेदवार उभा करणार नाही असं म्हटलं. मात्र महाविकास आघाडी पक्षातील असमन्वयामुळे बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली.
जूनच्या सुरूवातीला राज्यसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पक्षाची मते दाखवूनही अपक्ष, घटक पक्षांच्या जीवावर भाजपाने तिसरा उमेदवार निवडून आणण्यास यश मिळवलं. त्यानंतर २० जूनच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ५ उमेदवार रिंगणात उतरवले. मविआच्या आमदारांमध्ये असंतोष असल्याने अतिरिक्त उमेदवार उभा केल्याचा दावा भाजपाने केला. नेमकाच हाच असंतोष निकालात पाहायला मिळाला. शिवसेनेसह काँग्रेसही काही मते फुटल्याने भाजपाचा उमेदवार जिंकून आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यात मंत्री एकनाथ शिंदे नॉटरिचेबल झाले आणि शिवसेनेला धक्का बसला. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ आमदारांनी मविआ सरकारपासून फारकत घेतली आणि अखेर २९ जून रोजी सरकार अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे नारायण राणेंचे ते विधान अगदी खरे ठरले. २ महिन्यात राजकीय चक्रे वेगाने फिरली आणि राज्यात सत्तांतर घडून आले.