Maharashtra Political Crisis: "बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं, ती माणसं मोठी झाली आणि विरोधात गेली"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 09:25 PM2022-06-29T21:25:22+5:302022-06-29T21:46:18+5:30
दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
मुंबई - शिवसेनेचे दिग्गज नेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 50 बंडकोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचे समर्थन काढल्याचे जाहीर केले, त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. दरम्यान, आताच सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारला धक्का देणारा निर्णय दिला. उद्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोरांवर टीकाही केली.
Supreme Court gives go ahead to the floor test in the Maharashtra Assembly tomorrow; says we are not staying tomorrow's floor test. pic.twitter.com/neYAIftfWe
— ANI (@ANI) June 29, 2022
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मी गेल्यावेळेस म्हणालो होतो, काळजी करण्याची गरज नाही. ज्या गोष्टी चालू होत्या, त्या चालूस राहतील. तुमच्या आशिर्वादाने इथपर्यंची वाटचाल चांगली झाली. सरकार म्हणून आपण काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडला निधीन देऊन सुरुवात केली. हा एक योगायोग होता. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. आतासुद्धा पीक विमा योजनेचे बीड पॅटर्न करुन घेतले.''
''या सगळ्या गोंधळात, काही गोष्टी बाजूला पडतात. आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. आज मला विशेष समाधान आहे, आयुष्य सार्थकी लागलं. स्वतः शिवसेनाप्रमुखांनी ज्या शहराला संभाजीनगर नाव दिलं, त्याचे नामांतर माझ्या हाताने झाले. उस्मनाबादचेही धाराशिव केले. जिथे लहानाचा मोठा झालो, आता मुख्यमंत्री झालो, त्या वांद्रे वसाहतीत लोकांना भूखंड मंजूर केला.''
'सर्व सहकार्यांचे आभार'
ते पुढे म्हणाले की, '' असे म्हणतात ना एखादी गोष्ट चांगली चालू असते, तेव्हा दृष्ट लागते. कोणाची लागली, ते तुम्हाला माहिती आहे. आज मला सोनिया , शरद पवार आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानायचे आहे. दुःख या गोष्टीचे वाटले की, या ठरावाच्या वेळेस आम्ही फक्त चार मंत्री होतो, बाकीचे मंत्री तुम्ही जानता कुठे आहेत. इतर पक्षांनी एका शब्दानेही या नामांतराला विरोध केला नाही, त्यांना धन्यवाद. ज्यांचा विरोध होता असं भासवलसं जात होतं, ते सोबत राहिले आणि जे सोबत होते, ते विरोधात गेले.
'बाळासाहेबांनी खूप काही दिलं'
''बाळासाहेबांनी अनेक लहानांना मोठं केलं. नगरसेवक, आमदार खासदार आणि मंत्रीही केलं. ही माणसे मोठी झाली, मोठी झाल्यानंतर आम्हालाच विसरले. ज्यांना मोठं केलं, सत्ता आल्यानंतर शक्य ते सगळं दिलं, ती लोक आज नाराज आहेत. मी मातोश्रीवर आल्यानंतर साधी माणसं येथे येतायत, ते म्हणतात आम्ही सोबत आहोत. ज्यांना दिलं, ते नाराज, ज्यांना काही दिलं नाही, ते सोबत आहेत. याला म्हणतात शिवसेना. या नात्याच्या जोरावर सेना उभी आहे. अनेक आव्हान या लोकांच्या सोबतीने परतवत आली आहे.''