औरंगाबादचं संभाजीनगर नामांतरण प्रस्तावाचा वाद; शिवसेनेचा एक्झिट प्लॅन ठरला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 04:29 PM2022-06-29T16:29:22+5:302022-06-29T16:30:07+5:30
शिवसेनेने नामांतरणाचा प्रस्ताव आणत एकप्रकारे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समोर येत आहे. कारण नामांतरणाच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचा विरोध आहे. आ
मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३९ आणि अन्य ११ आमदारांनी मविआचं समर्थन काढलं आहे. त्यामुळे मविआ सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला बहुमत चाचणी करण्याचे निर्देश देत ३० जूनला विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यपालांच्या निर्देशाविरोधात सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा कोर्टाच्या निर्णयाकडे आहेत. यातच शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणत सरकारमधून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन बनवला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्री अनिल परब यांनी सांगितल्याप्रमाणे औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करावं असा प्रस्ताव आजच्या कॅबिनेट बैठकीत आणला जाणार आहे. औरंगाबादसोबत उस्मानाबादचं धाराशीव नामांतरण करावं असाही प्रस्ताव कॅबिनेट समोर आणला जाईल.
शिवसेनेने नामांतरणाचा प्रस्ताव आणत एकप्रकारे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समोर येत आहे. कारण नामांतरणाच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचा विरोध आहे. आता सरकार अल्पमतात आले आहे. बहुमत चाचणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सामोरे जायचं आहे. त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतरणाचा प्रस्ताव आणून शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची एक्झिट प्लॅन ठरवला आहे असंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
संभाजीनगर हे माझ्या वडिलांनी दिलेले वचन आहे. ते विसरलो नाही. ते केल्याशिवाय राहणार नाही. दीड वर्षापूर्वी विधानसभेत ठराव मंजूर झाला आहे. कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. विमानतळाचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर करावं पुढे पाठवला आहे. छत्रपती संभाजीनगर करण्याआधी शहर विकसित करायचं आहे. नाव बदलायला आता बदलू शकतो. रस्ते, पाणी नसतील तर नाव बदलून काय अर्थ? दिल्ली दरबारी विमानतळाचा नाव बदलण्याचा प्रस्ताव दिलाय तो केंद्रातून मंजूर करून आणा आम्ही तुमचा सत्कार करतो असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी भाजपाला दिलं होतं.