Maharashtra Political Crisis: आम्हाला गद्दार म्हणू नका, उद्या विरोधात मतदान केले तर...; केसरकर संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 01:46 PM2022-06-28T13:46:40+5:302022-06-28T13:50:13+5:30
Eknath Shinde Revolt: सत्तेत बहुमत गमावलंय तरी काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा काढला नाही. विश्वासदर्शक ठराव सरकारने मांडावा आम्ही मतदान करू असं आव्हान केसरकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलंय.
गुवाहाटी - उद्या आम्हाला मतदान करायला लागलं तर उद्धव ठाकरेंच्या विरोधात मतदान केले हे बोलू नका. आम्हाला गद्दार एकाही शिवसैनिकांनी म्हणू नये. कितीवेळा आम्ही आवाहन करणार आहोत. आजचा शेवटचा दिवस आहे. युवासेनेची ताकद लोकांच्या मागे वाहन लावण्यासाठी करू नये. राजकारणात सत्ता येते आणि जाते. समविचारी पक्षासोबत राहा. उद्या आवाहन करायला मी नसेन. शिंदे गट जो निर्णय घेईल त्याच्यासोबत जावं लागेल असा इशारा शिंदे गटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, सत्तेत बहुमत गमावलंय तरी काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा काढला नाही. विश्वासदर्शक ठराव सरकारने मांडावा आम्ही मतदान करू. महाराष्ट्रात लोकशाही आहे. त्याला थोर परंपरा आहे. रस्त्यावर येण्याची भाषा राऊत करतात. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही त्यांच्यावर हक्कभंग आणू शकतो. जेलमध्ये पाठवू शकतो. आधी राजीनामा द्या मग बोला. राऊत जी भाषा बोलतायेत त्यामुळे ५० आमदार संतप्त झालेत अशी माहिती केसरकरांनी दिली.
आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही
प्रेतांची मते घेऊन निवडून आलात तर राजीनामा द्या, संजय राऊतांना बोलायचा नैतिक अधिकार नाही. गद्दार हा आमचा शब्द आमच्या वाणीवर येणार नाही. राऊतांनी काय काय केले हे लेखी दिले आहे. राऊतांमुळेच शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाला. असा प्रवक्ता कुठल्याही पक्षाला मिळू नये. बाळासाहेबांना अपेक्षित विजय कोकणात मिळाला. आपल्याच माणसांना जबरदस्तीने बाहेर पाठवतायेत आणि त्यांना गद्दारीचा शिक्का मारताय. एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटनेसाठी झटकले. मुख्यमंत्रिपद विचारलं तरी घेतलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीला ते कंटाळले. मला जे काही वाटले ते उघडपणे बोललो. ५० आमदारांच्या भावना आम्ही व्यक्त केला. माझ्या मतदारसंघात मी २ हजार रस्त्यावर उतरवलो शकतो. १५० जणांचे आंदोलन करता असंही त्यांनी सांगितले आहे.
BJP सोबत युतीचा निर्णय आजच घ्या, शेवट गोड करा; शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम
उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींशी बोलावं
आमचा संयम सुटत चालला आहे. दिल्लीतील भाजपा नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी बोलावी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने व्हावेत अशी इच्छा आहे. कुठेतरी भाजपा-शिवसेनेचं वितुष्ट संपवावं, शेवट गोड व्हावा. भाजपाचे प्रमुख मोदीजी तुम्हाला लहान भाऊ मानतात. तुम्ही थेट त्यांच्याशी बोला असं आवाहन केसरकरांनी केले आहे.