नवा पेच! निलंबनाची नोटीस असताना एकनाथ शिंदेंचा शपथविधी कसा?; शिवसेनेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 01:23 PM2022-07-01T13:23:26+5:302022-07-01T13:24:39+5:30
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. राज्यपाल घटनाबाह्य वागतात असा आरोप शिवसेनेने केला आहे.
मुंबई - राज्याच्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपानं शिंदे गटाच्या ५० आमदारांना पाठिंबा देत राज्यात बंडखोरांचे सरकार स्थापन केले. गुरुवारी राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. परंतु आता शिंदे सरकारसमोर नवा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. निलंबनाची कारवाई असताना एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला कसा? असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारला आहे.
शिवसेना प्रवक्ते आणि खासदार अरविंद सावंत म्हणाले की, मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यावं हीच मागणी उद्धव ठाकरे करत होते. मात्र भाजपाने अडीच वर्षापूर्वी ते केले नाही. मात्र आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. राज्यपाल घटनाबाह्य वागतात. शपथविधीला सर्वात मोठ्या पक्षाला बोलवलं जातं. मग एकनाथ शिंदेंना काय म्हणून बोलावलं. निलंबनाची नोटीस असताना शपथविधी कसा झाला? अपात्रतेची कारवाई होण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका आहे. ११ जुलैला सुनावणी होणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्याचसोबत मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यानंतर दिल्लीवरून फोन आल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पक्षाच्या आदेशाचा मान देवेंद्र फडणवीसांनी राखला पण हीच पक्षशिस्त एकनाथ शिंदे यांच्यात कुठे आहे? असं सांगत अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
...त्यामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन होतेय
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याचा आनंद सगळ्या शिवसैनिकांना आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आजूबाजूचे लोक चुकीचं मार्गदर्शन करतात. शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय ते स्वीकारलं पाहिजे. परंतु कुठेतरी अडवायचं त्यासाठी केले जातेय. परंतु यामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलीन होतेय. उद्धव ठाकरेंच्या स्वभावाबाबत नाराजी नाही. परंतु दुसऱ्याबाजूला मृतदेह येतील, घाण, डुकरं बोलले गेले. एकीकडे गटनेतेपदावरून काढायचं, आमच्याविरोधात आक्षेपार्ह बोलायचं हे कोण ऐकून घेईल असा सवाल शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी विचारला आहे.
तसेच कायदेशीर लढाईला आम्ही पूर्णपणे तयार आहोत. परंतु आता हे वाद संपले पाहिजेत. महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं काम झाले पाहिजे. तुम्ही विकासाच्या गोष्टी कुठे करतायेत. सत्तास्थापन झाली आता भांडणं संपवली पाहिजे. मतभेद विसरून राज्याचा विकास करायला हवा असंही शिरसाट यांनी सांगितले.