Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील बंडामुळे अपक्षही बिथरले? गीता जैन यांची सूचक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 11:53 AM2022-06-21T11:53:51+5:302022-06-21T11:56:41+5:30
Maharashtra Political Crisis: शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी काही अपक्ष आमदारांनी आपला पाठिंबा दिला होता. यामध्ये मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांचा देखील सहभाग आहे.
शिवसेनेने विधान परिषदेला आपल्या अपक्ष आमदारांची मते काँग्रेसकडे वळविली होती. असे असले तरी काँग्रेसचा उमेदवार पडला होता. यामुळे काँग्रेस आमदारांत नाराजी असल्याचे वारे सुरु असताना अचानक शिवसेनेत एकनाथ शिंदेंनीच बंड पुकारल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे आता अपक्ष आमदार देखील बिथरल्याचे दिसत आहेत.
शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी काही अपक्ष आमदारांनी आपला पाठिंबा दिला होता. यामध्ये मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांचा देखील सहभाग आहे. जैन यांनी फेसबुक पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक पत्रकारांनी तसेच कार्यकर्त्यांनी संपर्क साधला असून भूमिकेबद्दल विचारणा केली. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की पुढील वाटचालीबद्दल जो काही निर्णय असेल तो सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य वेळी घेण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत मध्यरात्री पोहोचलेल्या आमदारांमध्ये रमेश बोरणारे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल हे आहेत. या आमदारांना शिंदे यांनी मोठया प्रमाणात विकासनिधी दिला आहे. दुसरीकडे राजन विचारे, रविंद्र फाटक हे ठाण्यातच आहेत. प्रताप सरनाईक यांचा फोन मात्र नॉट रिचेबल येत आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज दुपारी सूरतमध्येच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वृत्त आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे राज्यातील राजकारणात भूकंप झाला असून, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार वास्तव्य करून असलेल्या हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.