Maharashtra Political Crisis: मंत्रालयातील सर्व सचिवांची बैठक बोलावली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 11:13 AM2022-06-23T11:13:44+5:302022-06-23T11:14:49+5:30
शिंदे गटाकडे आता शिवसेनेचे ४२ आमदार आणि ८ अपक्ष आमदार आहेत. तर काही खासदारही आता शिंदेंना जाऊन मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील राजकीय भूकंप एवढा मोठा आहे, की मातोश्रीला देखील त्यात तग धरता येणे कठीण दिसू लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि धनुष्य बाणच आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडून मातोश्रीवर बस्तान हलविले आहे.
या साऱ्या घडामोडींवर उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त सचिव, प्रधान सचिवांसह अन्य सचिवांना दुपारी साडेबारा वाजता ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी ही बैठक कशासाठी बोलविली आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
शिंदे गटाकडे आता शिवसेनेचे ४२ आमदार आणि ८ अपक्ष आमदार आहेत. तर काही खासदारही आता शिंदेंना जाऊन मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेकडे म्हणजेच ठाकरेंकडे सध्या १४ आमदार राहिले आहेत. तर खासदारही शिंदेंकडे गेल्यास या राजकीय भूकंपाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संजय राऊत काय म्हणाले...
ही आमदार, खासदार, नगरसेवक गेले याचा अर्थ पक्ष गेला असं होत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार यांनी प्रतिक्रिया दिली. "गेलेले आमदार का गेलेत त्याची कारणं लवकरच समोर येतील. काही लोक आमच्या संपर्कात आहेत. काही आमदारांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्यावर दबाव आहे. शिवसेनेचे १७-१८ भाजपाच्या ताब्यात आहेत. त्यांच्या मदतीशिवाय अशाप्रकारे भाजपाशासित राज्यात आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही", असा आरोपही संजय राऊत Sanjay Raut यांनी केला.