Maharashtra Political Crisis : "आज निराशा असली तरी अपना भी टाईम आएगा"; रोहित पवारांची 'ती' फेसबुक पोस्ट चर्चेत, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 02:28 PM2022-06-30T14:28:13+5:302022-06-30T14:37:22+5:30

Maharashtra Political Crisis NCP Rohit Pawar facebook post : रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. 

Maharashtra Political Crisis NCP Rohit Pawar facebook post Over Uddhav Thackeray and Political situation | Maharashtra Political Crisis : "आज निराशा असली तरी अपना भी टाईम आएगा"; रोहित पवारांची 'ती' फेसबुक पोस्ट चर्चेत, म्हणाले...

Maharashtra Political Crisis : "आज निराशा असली तरी अपना भी टाईम आएगा"; रोहित पवारांची 'ती' फेसबुक पोस्ट चर्चेत, म्हणाले...

googlenewsNext

मुंबई - उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल मुख्यमंत्रीपदासह विधानसभा परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच कोसळलं आहे. गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे पडदा पडला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "आज काहीसी निराशा असली तरी अपना भी टाईम आएगा" असं म्हटलं आहे. रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. 

"कोरोना, वादळे, महापूर यांसारख्या असंख्य संकटांवर मात करत मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात महाविकासआघाडी सरकारने गेली अडीच वर्षे सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसा राज्यकारभार केला. सर्वसामान्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे भावणारे मुख्यमंत्री राजीनामा देत असताना महाराष्ट्र नक्कीच स्तब्ध झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलंच असेल.उपलब्ध सर्व आर्थिक-राजकीय संसाधनांचा पद्धतशीरपणे वापर करणाऱ्या राज्यातील भाजपा नेतृत्वाला महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे श्रेय नक्कीच जाईल. कारण गेली अडीच वर्षे शक्य ते सर्व प्रयत्न करूनही यश येत नव्हते अशा स्थितीत सातत्याने सरकार पाडण्याचे प्रयत्न करत राहणं ही साधी सोपी गोष्ट नव्हती."

"सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून राजकीय पटलावर वावरत असताना राजकारणाच्या बाबतीत माझा विचार काहीसा वेगळा होता. परंतु सध्याचं सत्तानाट्य बघितल्यानंतर मात्र राजकारणात बऱ्याच इतर गोष्टीही आवश्यक असतात, हे आज काहीअंशी जाणवलं. राजकीय रणनीती म्हणून बघताना भाजपच्या काही गोष्टी शाश्वत असल्या तरी सत्तेचा हा मार्ग पूर्णता शाश्वत होऊ शकत नाही, हेही तेवढंच सत्य आहे. सामान्य माणसात राहून सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम करणं हा मार्ग कठीण असला तरी सत्तेचा हाच शाश्वत मार्ग असू शकतो. त्यामुळं आज काहीसी निराशा असली तरी ‘अपना भी टाईम आएगा’ हाही विश्वास आहे."

"सुरत - गुवाहाटी कुठल्या का मार्गाने होईना भाजपचे सरकार राज्यात स्थापन होतेय, याबद्दल त्यांना नक्कीच शुभेच्छा असतील. जीएसटीचे पैसे, ओबीसी–मराठा–धनगर आरक्षण असे अनेक विषय केंद्राशी संबंधित आहेत. केवळ महाविकास आघाडी सरकारला श्रेय मिळेल म्हणून या सरकारच्या काळात केंद्राने हे विषय सोडवण्यास सहाय्य केलं नाही. परंतु राज्यात आता भाजपचं सरकार स्थापन होत असताना राज्याचे नेतृत्व नक्कीच हे सर्व विषय केंद्राकडून प्रामाणिकपणे सोडवून आणेल, ही आशा आहे."

"मुख्यमंत्र्यानी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने अजित दादा तसेच काँग्रेस नेत्यांच्या सोबतीने राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा, तत्वांचा वसा पुढे नेत विघातक वृत्तीच्या राजकारणापासून राज्याचं संरक्षण करत सामाजिक एकतेचा धागा मजबूत केला. येणारं सरकारही त्याच पावलांवर चालत महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जपेल ही अपेक्षा आहे. देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यासाठी सुरत–गुवाहाटीवरून केंद्रीय सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा मार्ग काहींनी शोधला असला तरी हे सत्तानाट्य महाराष्ट्राच्या जनतेला नक्कीच पटलेलं नसेल. सत्य आज कुठेतरी काही अंशी हरताना दिसत असलं तरी शेवटी विजय मात्र सत्याचाच होतो हा इतिहास राहिला आहे. येणाऱ्या काळात ज्या दिवशी जनतेकडून कौल घेतला जाईल त्यादिवशी नक्कीच सत्याचा विजय होईल, हा विश्वास आहे" असं रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 
 

Web Title: Maharashtra Political Crisis NCP Rohit Pawar facebook post Over Uddhav Thackeray and Political situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.