Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राला फडणवीस, एकनाथ शिंदेच स्थिर सरकार देऊ शकतात; मविआतील घटक पक्षाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 02:18 PM2022-06-29T14:18:57+5:302022-06-29T14:20:16+5:30
राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विरोधी पक्ष भाजपने केलेली मागणी राज्यपालांनी मान्य केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी प्रतिक्रिया देत महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच स्थिर सरकार देऊ शकतात अशी भूमिका घेतली आहे.
“महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पीपील्स रिब्लिकन पार्टी महाविकास आघाडीचा प्रमुख घटकपक्ष आहे. आम्हाला महाविकास आघाडीनं सत्तेत कोणताही वाटा दिला नाही. सत्तेत वाटा दिला नाही तरी चालेल पण या महाविकास आघाडी सरकारनं आम्हाला सन्मानाची वागणूकही दिली नाही. महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं स्थिर सरकार देऊ शकत असतील, तर ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आहेत, अशी आमची भूमिका आहे. यावर आम्ही ठाम आहोत,” असं जयदीप कवाडे म्हणाले.
३ जुलै रोजी सरकार?
राज्यात ३ जुलै रोजी नवीन सरकार स्थापन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजपा आणि शिवसेनेचं सरकार स्थापन करण्याबाबत शिंदे गटाने स्ट्रॅटेजी तयार केल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. सगळ्या आमदारांचे बहुमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना, असा स्टँड बंडखोर गट घेणार आहे. त्यामुळे सरकार भाजप-शिवसेनेचे स्थापन होईल, आणि खरी शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे पुढे काही वर्ष चालू राहील, अशी स्ट्रॅटेजी असल्याचे समजते.