Maharashtra Political Crisis: १२-१३ नाही, एकनाथ शिंदेंसोबत २५ आमदार असण्याची शक्यता; ठाकरेंचे चार मंत्रीही नॉट रिचेबल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 10:23 AM2022-06-21T10:23:32+5:302022-06-21T10:24:02+5:30
Eknath Shinde News: एकनाथ शिंदे हे आज दुपारी सूरतमध्येच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वृत्त आहे.
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले असले तरी एकनाथ शिंदेंनी अचानक बंड पुकारल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेत उभी फूट पडली असून शिंदेंसह जवळपास शिवसेनेचे २५ आमदार गुजरातच्या सुरतमध्ये रातोरात दाखल झाल्याने महाराष्ट्रात मोठा भूकंप झाला आहे.
उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य धोक्यात आले आहे. सुरतला दोन गटामध्ये आमदार दाखल झाले. सुरुवातीला रात्री ९ च्या सुमारास काही आमदार सुरतमधील एका हॉटेलमध्ये दाखल झाले होते. यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत रात्री १-२ वाजता काही आमदार असे २५ आमदार तिथे दाखल झाले, असे सूत्रांनी सांगितले. यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत मध्यरात्री पोहोचलेल्या आमदारांमध्ये रमेश बोरणारे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल हे आहेत. या आमदारांना शिंदे यांनी मोठया प्रमाणात विकासनिधी दिला आहे.
दुसरीकडे राजन विचारे, रविंद्र फाटक हे ठाण्यातच आहेत. प्रताप सरनाईक याचा फोन मात्र नॉट रिचेबल येत आहे. शंभूराज देसाई, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार हे तीन मंत्री नॉट रिचेबल झाले आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज दुपारी सूरतमध्येच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वृत्त आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे राज्यातील राजकारणात भूकंप झाला असून, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार वास्तव्य करून असलेल्या हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.