Maharashtra Political Crisis: मंत्रिपदाआधीच बंडखोर एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून 'झेड' दर्जाची सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 02:36 PM2022-06-30T14:36:54+5:302022-06-30T14:37:03+5:30
Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले.
मुंबई: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले. शिंदेंसह जवळपास 50 आमदारांनी सरकारमधूल पाठिंबा काढून घेतल्यामुळे, काल उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच आता एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून 'झेड' दर्जाची सुरक्षा देण्यात पुरवण्यात आली आहे.
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गोवा येथे थांबलेल्या आमदारांसोबत बैठक घेतली आणि बैठकीनंतर ते मुंबईसाठी रवाना झाल्याची माहिती आहे. अशातच एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याची माहिती आहे. शिंदेंच्या बंडखोरीमुळे राज्यात शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. यामुळेच केंद्राकडून त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत आल्यानंतर शिंदे राज्यपालांची भेट घेतील.
भाजप-शिंदे गटाची सत्ता
सरकार कोसळल्यानंतर आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार येणार आहे. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यात आज संध्याकाळी उशीरा राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आजच्या शपथविधीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदे हे तिघे शपथ घेऊ शकतात.