रस्त्यावर गद्दार फिरता कामा नये, लक्षात घ्या; संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 05:42 PM2022-06-28T17:42:01+5:302022-06-28T17:42:47+5:30
आम्ही शिवसेनेत आहोत, कुठली तुझी शिवसेना, कोण तुझा नेता? असा सवालही राऊतांनी शिंदे गटातील आमदारांना केला आहे.
अलिबाग - शिवसेनेच्या नावावर पैसे कमवताना आनंद दिघे आठवले नाही? उपमुख्यमंत्रीपद हवं, ईडीपासून सुटका हवी म्हणून हे बंड आहे. मर्दासारखं सामोरं जावं. या पळपुट्या आमदारांपासून सुटका मिळाली. राज्यात शिवसेना संपवण्याचं कारस्थान सुरू आहे. आम्हाला हिंदुत्व कुणीही शिकवू नये. केंद्राच्या बंडखोरांना विशेष सुरक्षा दिली जाणार आहे. हे गद्दार रस्त्यावर फिरता कामा नये, बाळासाहेबांनी सांगितलंय रस्त्यावर उघडं करून मारा असं आवाहन संजय राऊतांनी शिवसैनिकांना दिलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, वर्षा बंगला सोडला तेव्हा देशातील जनतेच्या डोळ्यात पाणी आले. या तिन्ही पक्षांनी संयमी चेहरा सरकार चालवायला हवं म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आज जे बंडखोर झाले त्यांना भाजपामुळेच मुख्यमंत्रिपद मिळाले नाही. गुलाम बनवून आमदारांना गुवाहाटीला ठेवले आहे. अडीच वर्षाचा शब्द भाजपाने पाळला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. आपल्याला आता करेक्ट कार्यक्रम करायचा आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच दलाल पैशासाठी गेले. गळ्यात बोर्ड लावून उभं राहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याशी बेईमानी करतात. आम्ही शिवसेनेत आहोत, कुठली तुझी शिवसेना, कोण तुझा नेता? बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना वेगळी करता येत नाही. दुसरी शिवसेना निर्माण करता येणार नाही. ठाकरे आणि शिवसेना एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहे. कित्येक लोकांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक गेले कुठेतरी गुलामच झाले. शिवसेना इथं आहे. नाव कशाला लावता असा सवाल संजय राऊतांनी केला.
दरम्यान, जिथे ठाकरे तिथे शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा वरून पाहतोय, ज्यांनी क्लेष दिला त्यांना त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल. सुखाने झोप येणार नाही. आमचा एक शिवसैनिक १०० कोटींचा आहे. मावळ्यांच्या जीवावर शिवसेना पुढे जाईल. शिवसेना या चार अक्षरामुळे आम्ही आमदार, खासदार, मंत्री झालो. या शिवसेनेला सोडून तुम्ही जाणार असाल तर तुम्ही तुमची कबर खोलली. ही राजकीय कबर आहे. जनता त्यावर माती टाकल्याशिवाय राहणार नाही. रायगड जिल्ह्यात गवतालाही भाले फुकतात हा जिल्हा आहे. छत्रपतींची समाधी जिल्ह्यात आहे. गद्दारांना माफी नाही, काहीही झाले तरी झुकेगा नही असा इशाराही राऊतांनी दिला.
मला तुरुंगात टाका, फासावर द्या पण लाखो शिवसैनिक असेपर्यंत शिवसेनेच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. शिवसैनिक स्वत:च्या पायावर ठाम राहिले पाहिजे. जास्तीत जास्त वेळ संघटनेसाठी दिला पाहिजे. रायगडात सूर्याजी पिसाळ निर्माण होतील वाटलं नाही. रायगडसुद्धा अश्रू ढाळत असेल. हा मेळावा नाही तर एका जिद्दीने पुढच्या लढाईचं फुकलेले रणशिंग आहे. सेनापती उद्धव ठाकरे यांना पुन्हा सन्मानाने वाजत गाजत वर्षा बंगल्यावर न्यायचं आहे. बाळासाहेब ठाकरे यांची सगळ्यांना शपथ आहे. महाराष्ट्र आपला, मुंबई आपली, जिल्हा आपला यावर भगवा फडकतच राहणार ही खरी बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे असंही संजय राऊतांनी सांगितले.