Maharashtra Political Crisis : “का उगाच वण वण भटकताय?, गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ,” संजय राऊतांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 05:44 PM2022-06-23T17:44:38+5:302022-06-23T17:45:06+5:30
यापूर्वीही राऊत यांनी आमदारांना २४ तासांत मुंबईत येण्याचं केलं होतं आवाहन.
शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतु या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल, अशी घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.
“चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र!,” असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यांनी या ट्वीटद्वारे पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना चर्चेसाठी येण्यास सांगितलं आहे.
यापूर्वीही मांडली भूमिका
शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्य़ास तयार आहे. परंतु आमदारांनी २४ तासांत मुंबईत परत यावे, तिथे बसून पत्रे पाठवत बसू नये, असे संजय राऊत म्हणाले. मी अधिकृतपणे ही भूमिका मांडतोय, असेही राऊत म्हणाले होते. वर्षावर आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.