Eknath Shinde : "50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात तेव्हा याचा अर्थ..."; एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 05:11 PM2022-06-30T17:11:01+5:302022-06-30T17:22:55+5:30
Maharashtra Political Crisis Shivsena Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. य़ानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यांना भाजपाचा पाठिंबा देईल. या सरकारला माझे समर्थन असेल अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आम्ही सत्तेच्या पाठिशी नाही. कुठल्यातरी मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही काम करत नाही. ही तत्वाची, हिंदुत्वाची आणि विचारांची लढाई आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. य़ानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 50 आमदार का वेगळी भूमिका घेतात? याबाबत स्पष्टच सांगितलं आहे.
"राज्याच्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहेत. 50 आमदार एकत्र आहोत. जे काही अडीच वर्षांपूर्वी घडलं ते आपल्याला माहिती आहे. गेल्या काही काळात आम्ही मुख्यमंत्र्यांना मतदार संघातील समस्या, अडचणी याबाबत वारंवार माहिती दिली. मी अनेकवेळा चर्चा केली. जी काही नैसर्गिक युती होती. एकत्र निवडणुका लढवल्या. आमदारांमध्ये जी नाराजी होती. राज्याच्या हिताच्या दृष्टीने जे काही घडत होतं. काही सहकाऱ्यांवर झालेल्या कारवाई... महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेता येत नव्हते. हे सगळं होत असताना 50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात याचा अर्थ म्हणजे आत्मपरिक्षण करण्याची गरज होती. मोठ्या प्रमाणात 50 लोक एकत्र आले. त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. त्यामुळे हा निर्णय घेतला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
"बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिल्याबद्दल फडणवीसांचे मनापासून त्यांचे आभार. फडणवीसांनी मोठेपणा दाखवला. मोठं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. मुख्ममंत्री पद त्यांनाही घेता आलं असतं. पण मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना पाठिंबा दिला. सर्व ५० आमदारांनी जी लढाई लढलीये, वैचारिक भूमिका घेऊन, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन. धर्मवीरा आनंद दिघेंची शिकवण आहे, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलंय. त्यांनी जो विश्वास दाखवलाय त्याला कदापी तडा जाऊ दिला जाणार नाही" असं देखील शिंदे यांनी म्हटलं आहे.