Maharashtra Political Crisis : "स्वत:ला बंडखोर समजणाऱ्यांना वर गेल्यावर हिशोब द्यावाच लागेल"; संजय राऊतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 08:02 PM2022-06-29T20:02:52+5:302022-06-29T20:18:08+5:30
Maharashtra Political Crisis Shivsena Sanjay Raut : "संजय राऊत जेव्हा हे बोलतात, तेव्हा जे गुवाहाटीला बसलेत, त्यांना भयंकर राग येतो. संजय राऊतांना आवरा असं ते म्हणतात."
मुंबई - शिवसेनेने अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. मात्र, आता एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे बहुसंख्य आमदारांना घेऊन ठाकरे सरकारविरोधात बहुमत चाचणीची वेळ आणली आहे. यामुळे दोन दिवस सलग ठाकरेंनी मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. आज उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मंत्रालयात आले होते. यावेळी मला माझ्याच लोकांनी दगा दिला, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. जर माझ्याकडून कोणाचा अपमान झाला किंवा दुखावले असतील तर मी माफी मागतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"स्वत:ला बंडखोर समजणाऱ्यांना हिशोब द्यावा लागेल" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी "उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य हे हेलावून टाकणारं आहे. माझ्याच काही लोकांनी दगा दिल्यामुळे ही अवस्था झाली हे अस्वस्थ करणारं आहे. त्यांच्यासारखा एक सुसंस्कृत मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला. अजूनही ते मुख्यमंत्री आहेत. पण त्यांनी वेदना बोलून दाखवली. संजय राऊत जेव्हा हे बोलतात, तेव्हा जे गुवाहाटीला बसलेत, त्यांना भयंकर राग येतो. संजय राऊतांना आवरा असं ते म्हणतात. मी जे बोलतो, ते उद्धव ठाकरे वेगळ्या शब्दात म्हणाले. माझ्याच लोकांनी मला दगा दिला हे डोळ्यात पाणी आणणारं त्यांचं विधान आहे" असं म्हटलं आहे.
"उद्धव ठाकरे यांनी काहींना मुलासारखं, काहींना मित्रासारखं तर काहींना भावासारखं सांभाळलं. पण काहीही न पटणारी कारणं देऊन ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, ही वेदना महाराष्ट्राच्या मनात कायम राहील. दगाबाजीचा नवा अध्याय लिहिला गेला. औरंगजेबानो जशी संभाजी महाराजांची हत्या करवली, तशीच हत्या या लोकांनी लोकशाहीची केली. औरंगजेब जसा या मातीत गाडला गेला, त्याच पद्धतीने हे सगळे स्वत:ला बंडखोर समजतात, त्यांना वर गेल्यावर हिशोब द्यावा लागेल. हे तुम्ही खरंच राष्ट्रीय हेतूने केलं, की यामागे स्वार्थ होता वा अन्य काही होतं याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
"सकाळपासून शिवैसनिकांना नोटीस, डिटने करण्यास सुरूवात केली. उजळमाथ्यानं यायला पाहिजे आणि विधानसभेत जायला हवं. ते महान लोकं. त्यांची महानता भविष्यात कळेल. मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. माझ्यासारख्या माणसालाही त्रास व्हावा, अटक व्हावी यासाठी केंद्रीय सत्ता महाराष्ट्रातील भाजपच्या मदतीनं तुरुंगात टाकण्यास प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. उद्धव ठाकरे पळपूटे नाहीत. ज्या प्रकारे पाठींबा आणि भावना त्यांच्या पाठीशी आहेत, त्याचा आदर करतील. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतील. ज्यांना अशाप्रकारे सत्ता घ्यायची असेल ते घेऊ शकतील. येणारा काळ शिवसेनेचा असेल. पुन्हा एकदा शिवसैनिक पुन्हा मुख्यमंत्री करू" असंही राऊत म्हणाले.