Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टातील सुनावणीने शिवसेनेची उमेद वाढली? खासदार अरविंद सावंत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 02:27 PM2022-07-20T14:27:40+5:302022-07-20T14:49:55+5:30
Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टात झालेल्या आजच्या सुनावणीनंतर शिवसेनेची उमेद वाढली असून, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आजच्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली - महाराष्ट्रात झालेली राजकीय उलथापालथ आणि त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारविरोधात शिवसेनेने न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर आज झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणीसाठी १ ऑगस्ट ही तारीख कोर्टाने दिली आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात झालेल्या आजच्या सुनावणीनंतर शिवसेनेची उमेद वाढली असून, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आजच्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. आता अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टासमोरच येणार आहे. इतर कुणालाही त्यावर निर्णय घेता येणार नाही. तसेच सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अधिवेशनातील कामकाजाचं सर्व प्रोसिडिंग सिल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोरबरच सध्याचा घटनाक्रम हा मोठा मुद्दा आणि घटनात्मक पेच असल्याने हा मुद्दा मोठ्या घटनापीठासमोर घेण्याच्या विचारात असल्याचे कोर्टाने सांगितले आहे, तसेच तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे.
दरम्यान, सरन्यायाधीश एनव्ही रमना, जस्टिस कृष्ण मुरारी आणि हिमा कोहली यांच्या घटनापीठासमोर आज महाराष्ट्रातील घडामोडींबाबत दाखल याचिंकांवरील सुनावणी पार पडली. घटनात्मकरीत्या हे प्रकरण अत्यंत महत्वाचं आणि गुंतागुतीचं असल्यानं यापेक्षा मोठ्या खंडपीठाची गरज भासेल असं वाटतंय, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी यावेळी केली आहे. पण सध्यातरी तसे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत असंही ते पुढे म्हणाले आहेत. दुसरीकडे न्यायाधीशांनी दोन्ही पक्षकारांना २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता १ ऑगस्ट रोजीच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.