Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार? उदय सामंत म्हणाले, “आम्ही योग्य…”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 05:00 PM2023-05-10T17:00:07+5:302023-05-10T17:01:15+5:30
राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या म्हणजेच गुरुवारी लागण्याची शक्यता आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या म्हणजेच गुरुवारी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देऊ शकते अशी माहिती समोर येतेय. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार याची प्रतीक्षा राजकीय वर्तुळात होती. त्याचा निकाल आता गुरुवारी लागण्याची शक्यता आहे. यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आमच्या सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी योग्य बाजू मांडलेली आहे. आम्ही योग्य पुरावे दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्यापूर्वी बोलणं हे योग्य नाही. तो सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आहे. आम्ही सर्व बाबी पूर्ण केल्यात. सर्व कागदपत्रं दिलेली आहेत. आमच्या वकिलांनी भक्कमपणे बाजू मांडलीये, त्यामुळे योग्य निकाल येईल अशी अपेक्षा आहे,” असं उदय सामंत म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बाहेरच्या व्यक्तीनं बोलायचं नसतं असा नियम आहे. त्यामुळे आम्हाला योग्य निर्णय लागेल याची आम्हाला अपेक्षा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
सरकार कोसळणार की राहणार?
काही कायदेतज्ज्ञ १६ आमदार अपात्र ठरून शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा करत आहेत. तर काही कायद्याचे जाणकार आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही, असा दावा करत आहेत. मात्र, यातच शिंदे गटाकडून या प्रकरणी प्रतिक्रिया आली आहे. आम्ही काही चुकीचं केलेलं नाही, निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त करण्यात येत आहे.