Bacchu Kadu: इकडे सरकार कोसळलं अन् तिकडे बच्चू कडूंची फाईल बंद; रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 08:20 AM2022-06-30T08:20:35+5:302022-06-30T08:21:08+5:30
एकाबाजूला ठाकरे सरकार कोसळलं आणि दुसरीकडे बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चीट मिळाली आहे.
मुंबई-
राज्यात सत्ता संघर्षाच्या नाट्यावर अखेर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पडदा पडला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे सरकारवर नामुष्की ओढावली. शिंदे गटात आमदार बच्चू कडू यांचाही समावेश होता. एकाबाजूला ठाकरे सरकार कोसळलं आणि दुसरीकडे बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चीट मिळाली आहे.
तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याचा ठपका बच्चू कडू यांच्यावर होता. या प्रकरणातून बच्चू कडू यांची आता निर्दोष मुक्तता झाली आहे. मूळात अस्तित्वातच नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी ९५ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. सिटी कोतवाली पोलिसात बच्चू कडू यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. या संपूर्ण प्रकरणात बच्चू कडू यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं सांगत पोलिसांनी या प्रकरणाची फाईल बंद केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले बच्चू कडू यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने आर्थिक अपहाराचे गंभीर आरोप केले होते. बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करीत १ कोटी ९५ लाखांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याची ठिणगी तीन रस्त्यांच्या कथित कामांवरून पडली. दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. एकूण तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडूंनी अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. यात जिल्हा परिषदेच्या अधिकारावर पालकमंत्र्यांनी अतिक्रमण केल्याचं वंचितनं म्हटलं होतं. यात रस्त्यांचे 'ग्रामा (ग्रामीण मार्ग) क्रमांक' नसतांना कामांना प्रशासकीय मान्यता कशी मिळू शकते, असा सवाल वंचितनं केला होता. दरम्यान, वंचितच्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरांनी या तीन रस्त्यांसह 25 कामांना दिली स्थगिती दिली होती.