Ramdas Athawale : महाविकास आघाडीचा सरकारचा बहुमत सिद्ध करण्याचा दावा हास्यास्पद - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 02:51 PM2022-06-28T14:51:56+5:302022-06-28T14:52:42+5:30
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा करावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा आजचा आठवा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. हे सर्व आमदार गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. यावरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या स्थितीत राजीनामा द्यायला पाहिजे होता. अल्पमतात आलेले महाविकास आघाडी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा करीत असलेला दावा हास्यास्पद आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच, शिवसेनेचे ४० हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. काही अपक्ष आमदार शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. आता बहुमत भाजप, एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा लवकर करावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
याचबरोबर, शिवसेनेचे जे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. त्यांच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत. पोलिसांच्या समोर हल्ले होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेचा वारसा आहे. त्यावर हल्ला होत आहे. राज्याची प्रतिमा डागाळली जात आहे. यावर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी कठोर भूमिका घेऊन पोलिसांना कायदा सुव्यवस्थेबाबत कर्तव्य पार पाडण्याचे निर्देश द्यावेत, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. याशिवाय, शिवसेनेने पराभव स्वीकारला पाहिजे. त्यासाठी आमदारांच्या कार्यालयावर हल्ले करणे, गुंडगिरी करणे योग्य नाही. शिवसेनेने गुंडगिरी थांबवावी. अन्यथा गुंडगिरीला गुंडगिरीने उत्तर द्यावे लागेल. गुंडगिरीने शिवसेना सरकार वाचवू शकणार नाही, असा इशारा सुद्धा रामदास आठवले यांनी दिला आहे.