"माझ्याकडे कुणी राजीनामा घेऊन आला तर..."; भगतसिंह कोश्यारींची सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 03:37 PM2023-05-11T15:37:33+5:302023-05-11T15:38:03+5:30
सुप्रीम कोर्टाकडून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढण्यात आले
Bhagat Singh Koshyari Reaction, Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकीय सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल सुनावला. आजच्या निकालातील ठळक वैशिष्ट्ये सांगताना, सुप्रीम कोर्टाने राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन अविश्वास प्रस्तावाचे पत्र दिले असले तरी राज्यपालांनी मात्र याबाबत थेट फ्लोअर टेस्टची मागणी करणे घटनाबाह्य होते अशा आशयाचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूने विविध प्रतिक्रिया आल्या. पण अखेर या निकालाच्या सुमारे, तीन तासानंतर खुद्द भगतसिंह कोश्यारी यांनी या विषयावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले तत्कालीन राज्यपाल कोश्यारी?
"मी कधीच पदमुक्त झालो आहे. मी राज्यपालपद सोडून आता तीन महिने झाले आहेत. मी राजकीय बाबींपासून नेहमीच अंतर ठेवून असतो. जो विषय सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी होता, त्यावर त्यांनी निर्णय दिला आहे. अशा बाबींवर कायद्याचे जाणकारच आपले मत व्यक्त करू शकतात. मी कायद्याचा अभ्यासक नाही, मी केवळ संसदीय कार्यशैली जाणतो, त्यामुळे मी यावर बोलणे उचित ठरणार नाही. मी त्यावेळी जे निर्णय घेतले ते पूर्णपणे विचार करून घेतले होते. जर एखादा व्यक्ती माझ्याकडे राजीनामा घेऊन आला, तर मी त्याला, राजीनामा देऊ नको, असं म्हणणार का..?? सर्वोच्च न्यायालयाने जे काही म्हटले आहे त्यावर विवेचन करणे हे तुम्हा लोकांचे काम आहे. मी त्यावर टिपण्णी देणार नाही," असे ते म्हणाले.
शिंदे-फडणवीसांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा घेतला समाचार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पाहिली. त्यांची पत्रकार परिषद मी सहसा पाहत नाही. मात्र आज पाहिली. त्यात त्यांनी आपण नैतिकतेच्या मुद्दयावर राजीनामा दिल्याचे सांगितले. तसेच एकनाथ शिंदे यांनी नैतिकतेच्या मुद्दयावर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. मात्र उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले होते, तेव्हा त्यांनी नैतिकता कुठे होती कुठल्या डब्यात बंद केली होती. जनादेश डावलून मविआ स्थापन केली तेव्हा नैतिकता कुठे होती." तर एकनाथ शिंदे म्हणाले, "माजी मुख्यमंत्र्यांनी तेव्हा राजीनामा दिला. नैतिकतेचे कारण देऊन सांगताहेत. त्यांना माहिती होते, त्यांच्याकडे बहुमत नाहीय. अल्पमतात आलेले सरकार आहे. राज्यपालांच्या विषयावर बोलू इच्छित नाही. राज्यपालांनाच काय तुम्हाला सर्वांनाच माहिती होते, ते अल्पमतात आलेय. यामुळे राज्यपालांनी त्यांच्या अधिकारात निर्णय घेतला. हेडकाऊंट झाला त्याचे तुम्हा साक्षीदार आहात. नैतिकतेच्या ज्या गोष्टी सुरु झाल्यात तेव्हा शिवसेना भाजपा युतीला जनतेने बहुमत दिले होते. लोकांना हवे होते ते केले. भाजपासोबत निवडणूक लढविली आणि सत्तेच्या खूर्चीसाठी दुसऱ्यांसोबत गेले, यामुळे नैतिकता कोणी जपली हे सांगण्याची गरज नाही. धनुष्यबाण वाचविण्याचे काम आम्ही केले, बाळासाहेबांचा पक्ष वाचविला, तुम्ही गहाण ठेवला होता."