आम्ही सोबत आहोत, घाबरू नका; सोनिया गांधींनी फोन करून उद्धव ठाकरेंना दिला धीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 12:34 PM2022-06-29T12:34:47+5:302022-06-29T12:37:08+5:30
आम्हाला पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा कायम ठेवायची आहे. गुंडगिरी करून सत्ता काबीज करण्याला आमचा विरोध आहे.
मुंबई - शिवसेनेने त्यांचा गटनेता बदलला आहे. उद्या बहुमत चाचणीवेळी व्हिप जारी होईल मग हे प्रकरण कोर्टात आहे. एका रात्रीत राज्यपाल भवनाने बहुमत चाचणीसाठी पत्र दिले. ११ जुलैपर्यंत कोर्टाने म्हणणं मांडण्याची मुदत दिली. मग ४८ तासात बहुमत चाचणी का? हा चमत्कार आहे. लोकशाही, संविधानविरोधी काम राजभवनाकडून केले जाते असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
नाना पटोले म्हणाले की, शिवसेना कोर्टात गेली आहे. तीच भूमिका काँग्रेसची आहे. सध्या आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. ज्याच्याजवळ बहुमत असेल त्याचा मुख्यमंत्री होईल. राज्यपाल भाजपाचा अजेंडा महाराष्ट्रात राबवत आहेत. शिवसेनेचा गटनेता वेगळा आहे. हे बंडखोर गटाला मान्य नाही. विधानसभा हा आखाडा नाही. सुप्रीम कोर्टाने ११ जुलैपर्यंत वेळ दिलीय. वाट न बघता मध्येच ही चाचणी घेणे कुठल्या संविधानिक चौकटीत येते याचं उत्तर मिळणं गरजेचे आहे.
तसेच आम्हाला पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा कायम ठेवायची आहे. गुंडगिरी करून सत्ता काबीज करण्याला आमचा विरोध आहे. सत्तेपेक्षा राज्यात स्थिरता राहणं गरजेचे आहे. विरोधात बसायला आम्हाला काहीही अडचण नाही. भाजपा-शिवसेनेत बेबनाव झाला नसता तर हे सरकार आले नसते. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. सुखदुखात सोबत राहायचं ही प्रामाणिक भूमिका आहे. ज्याच्याशी मैत्री करायची ही प्रामाणिक करायची असंही नाना पटोले म्हणाले.
सोनिया गांधींचाउद्धव ठाकरेंना फोन
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून धीर दिला. आम्ही सोबत आहोत, घाबरण्यासारखं काही नाही. वेळ आल्यास तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ असंही सांगितले आहे. शिवसेनेत स्थिरता राहावी असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. २०१९ मध्ये लोकांनी आम्हाला जनतेने विरोधी बाकांवर बसण्याचं कौल दिला. परंतु त्यानंतर घडलेल्या घडामोडीत काँग्रेस सत्तेत आले. आमची विरोधात बसण्याची तयारी आहे असंही नाना पटोलेंनी सांगितले. बंडखोर आमदार अजूनही आम्ही शिवसेनेचे आहोत सांगतायेत. शिवसेनेचे आमदार सभागृहात आल्यानंतर भूमिका बदलू शकते. ही अग्निपरीक्षा बंडखोर आमदारांची आहे असंही पटोले म्हणाले.