Bharat Gogawale : 'ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही परत येणार नाही', बंडखोर आमदाराचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:49 AM2022-06-28T11:49:22+5:302022-06-28T11:50:39+5:30
Maharashtra Political Crisis : आजच्या बैठकीत सरकारचा पाठिंबा काढल्याबाबतचे पत्र राज्यपालांना द्यायचे की नाही आणि जर द्यायचं असेल तर ते कधी या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यासंदर्भातील माहिती एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.
मुंबई - शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. हे सर्व आमदार गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. यातच एकनाथ शिंदे गटातील आमदारांची आज दुपारी बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत सरकारचा पाठिंबा काढल्याबाबतचे पत्र राज्यपालांना द्यायचे की नाही आणि जर द्यायचं असेल तर ते कधी या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यासंदर्भातील माहिती एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी एबीपीशी संवाद साधला. यावेळी भरत गोगावले म्हणाले की, "आम्ही पूर्ण तयारीने याठिकाणी आलो आहोत. जर 11 जुलैपर्यंत इथे राहावे लागले तरी चालेल, आम्ही तयार आहोत. ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही परत येणार नाही. नियमांनुसार जी प्रक्रिया होणे गरजेची आहे, ती केली जात आहे. आम्ही काळजीपूर्वक पाऊल उचलत आहोत, कारण छोटीसी चूक झाली तरी काहीही फायदा होणार नाही. आजच्या बैठकीत राज्यपालांना पाठिंबा काढल्याबाबत पत्र द्यायचे की नाही आणि जर द्यायचे असेल तर ते कधी या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. आमच्या गटातून कोणीही बंडखोरी करणार नाही. उद्धव ठाकरे गटाला जे करायचंय ते करावे, आम्ही या लढाईसाठी पूर्णत: तयार आहोत."
दरम्यान, शिवसेनेतील फुटीर गटातील १६ आमदारांना महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिलेल्या अपात्रता नोटिशीला उत्तर देण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. या नोटीसविरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी येत्या ११ जुलैला होणार असल्याने महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचे ढग इतक्यात विरणार नसल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपाच्या हालचालीही वाढल्या आहेत. सोमवारी कोअर कमिटीची बैठक झाली. यात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. मात्र, अद्यापही भाजपा नेते सध्याच्या राजकीय स्थितीवर थेट भाष्य करणे टाळत आहेत. पण, भाजपा आमदारांना २९ जूनला मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आमदारांच्या बैठकीला विधानसभा अधिवेशनासाठी तयार राहण्याचे सांगण्यात येणार आहे. बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत.