'टीम देवेंद्र'मध्ये कोण होणार मंत्री?; 'या' चौघांना मिळू शकतात खास खाती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:16 PM2022-06-29T23:16:23+5:302022-06-29T23:16:49+5:30
Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्रीपदाची संधी मिळणार या बाबत राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
मुंबई - देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्रीपदाची संधी मिळणार या बाबत राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत. टीम देवेंद्रमध्ये भाजपच्या कोणाला संधी मिळणार आणि आधीच्या पाच वर्षातील कोणते चेहरे नसतील या बाबतही चर्चा रंगत आहे.
सत्तांतराच्या नाट्यात फडणवीस यांच्या कोअर टीममध्ये असलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, डॉ.संजय कुटे आणि आशिष शेलार यांना महत्त्वाची पदे मिळण्याची शक्यता आहे. शेलार यांच्या नावाचा विचार चंद्रकांत पाटील यांच्या जागी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठीदेखील होवू शकतो.
आधीच्या सरकारमध्ये ऊर्जा मंत्री राहिलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनाही महत्त्वाचे कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, अशी दाट शक्यता आहे. विधानसभेची उमेदवारी नाकारली गेल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर पाठविण्यात आले आणि प्रदेश सरचिटणीसदेखील करण्यात आले. माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा संधी दिली जाईल असे बोलले जाते.
किसन कथोरे, विजयकुमार गावित या ज्येष्ठ सदस्यांच्या समावेशाचीही सत्ता आहे. अहमदनगरचे राधाकृष्ण विखे पाटील,पुण्याच्या माधुरी मिसाळ, लातूरचे संभाजी पाटील निलंगेकर, सांगली जिल्ह्यातील सुरेश खाडे ही संभाव्य नावेदेखील असू शकतात. विभागीय व जातीय संतुलनाचा विचार मंत्रीपदे देताना केला जाईल. एकनाथ शिंदे गटाला ज्या जिल्ह्यात मंत्रिपदे दिली जातील तिथे भाजपच्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.