'एवढं महाभारत घडलं त्यात 'कोण' जिंकलं?' खासदार अमोल कोल्हेंची पोस्ट चर्चेत...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 05:48 PM2022-06-30T17:48:17+5:302022-06-30T17:48:29+5:30
Maharashtra Political Crisis: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा आज शेवट झाला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली.
मुबंई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा आज शेवट झाला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचे एक ट्विट चर्चेत आले आहे. 'एवढं जे महाभारत घडलं त्यात नेमकं कोण जिंकलं?' असा प्रश्न त्यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला आहे.
एवढं जे महाभारत घडलं
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 30, 2022
त्यात नेमकं“कोण” जिंकलं??#MaharashtraPoliticalCrisispic.twitter.com/EZ64obG7Gi
अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटसोबत एका कवितेचा फोटोही शेअर केला. त्यात लिहीले की,'खुर्ची तीच पाय तेच फक्त वरचं बूड बदललं, हुजरे तेच मुजरे तेच फक्त समोरचं धूड बदललं. फायली त्याच प्रस्ताव तेच फक्त सहीचं पेन बदललं, बोट तेच शाई तीच फक्त दाबलेलं बटन बदललं. माणसं तीच, भाषा तीच फक्त आतलं मन बदललं. आरोप तेच प्रकरणं तीच फक्त वातावरण बदललं पराभूतानं मन जिंकलं विजेत्यानं सत्व गमावलं. मतदारांनी लोकशाहीला अन् लोकशाहीनं न्यायपालिकेला पुसलं एवढं जे महाभारत घडलं त्यात नेमकं "कोण" जिंकलं?' अशा ओळी त्यांनी आपल्या शेअर केल्या.
काल नेमकं काय झालं..?
एकनाथ शिंदे यांच्या गटाने पाठिंबा काढून घेतल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी भाजपसह बंडखोरांवरही जोरदार टीका केली. याच सत्तानाट्यावरती अमोल कोल्हेंनी कवितेतून भाष्य केले.