Maharashtra Political Crisis: कोणत्याही क्षणी मुंबईत यावे लागेल, संपर्कात रहा! भाजपाचे राज्यभरातील आमदारांना तातडीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 11:06 AM2022-06-22T11:06:17+5:302022-06-22T11:08:30+5:30
Eknath Shinde Revolt: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीहून मुंबईत दाखल झाले आहेत. सागर बंगल्यावर आता बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. येथूनच भाजपाने आमदारांना तातडीचे आदेश पाठविले आहेत.
शिवसेनेने विधान सभेतील गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांना हटविल्याने शिंदेंकडून वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनामुळे हॉस्पिटलाईज असूनही आपल्या हातून सूत्रे सोडलेली नाहीत. या गोष्टी बरेच काही सांगून जात आहेत. त्यातच भाजपाने राज्यभरातील आमदारांना तातडीचे आदेश जारी केल्याने पुढील ४८ तास ठाकरे सरकारचे अखेरचे ठरण्याची शक्यता आहे.
अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी आता स्वत:हून राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. शिंदेंसोबत असलेल्या बच्चू कडूंनी तर आता डोक्यावरून पाणी गेल्याचे म्हटले आहे. एकनाथ शिंदे य़ांनी ३५ नाहीत तर आपल्यासोबत ४० आमदार आहेत, आणखी १० आमदार येत आहेत, असे सूतोवाच केले आहे.
अशातच भाजपाने आपल्या आमदारांना कुठल्याही दौऱ्यावर जाऊ नये, संपर्कात रहावे, कोणत्याही क्षणी मुंबईला यावे लागेल, असे आदेश दिले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीहून मुंबईत दाखल झाले आहेत. सागर बंगल्यावर आता बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. येथूनच भाजपाने आमदारांना तातडीचे आदेश पाठविले आहेत.
गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे व पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आहेत. ही संख्या ४० असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. तसेच गटनेते पदाचा दावा करण्यासाठी शिंदे गोव्याला जाण्याची शक्यता होती. गेल्या अर्ध्या तासापासून या आमदारांची बैठक सुरु आहे. या बैठकीत गटनेता ठरविला जाणार आहे. तसेच त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी शिंदे स्वत: राज्यपालांना भेटण्यास जाण्याची शक्यता आहे. याचवेळी भाजपाचे आमदारही संख्याबळ दाखवून सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.