Suresh Dhas : 'आका'ची टोळी अजूनही कार्यरत, एसीपी नवीन, त्यांना माहिती नाही'; सुरेश धसांचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:13 IST2025-04-10T13:06:44+5:302025-04-10T13:13:21+5:30
Suresh Dhas : भाजपा आमदार सुरेश धस यांनी आणखी एक नवीन गौप्यस्फोट केला आहे.

Suresh Dhas : 'आका'ची टोळी अजूनही कार्यरत, एसीपी नवीन, त्यांना माहिती नाही'; सुरेश धसांचा मोठा गौप्यस्फोट
Suresh Dhas : ( Marathi News ) : 'आका'ची लोक आजही कार्यरत आहेत. या लोकांनी याआधीही वॉचमनला मारहाण केली म्हणून एवढं सगळं घडलं. आजही 'आका'ची टोळी कार्यरत आहे, असा मोठा गौप्यस्फोट आमदार सुरेश धस यांनी केला. दोन दिवसापूर्वी मस्साजोग गावातील आवादा कंपनीमध्ये १२ लाख किंमतीच्या केबलची चोरी झाल्याचे समोर आले होते. चौरट्यांनी वॉचमनला बांधून ठेऊन ही चोरी केली होती. या प्रकरणावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
आज आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसोबत संवाद साधत असताना मोठा गौप्यस्फोट केला. आमदार धस म्हणाले, या लोकांनी दलित समाजातील वॉचमनला मारहाण केली होती. आताही 'आका'च्याच कोणत्यातरी सहकाऱ्याने हे केले असेल. दोन दिवसात आरोपी सापडेल, त्यांची टोळी आजही कार्यरत. 'आका'ने जे लोक जागोजागी ठेवले आहेत ते आजही आहेत. त्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत, ते त्रासदायक आहेत, असंही धस म्हणाले.
सामान्य माणूस पैशाअभावी मरता कामा नये; 'आयुष्मान भारत' राज्य समितीकडून रुग्णालयांना तंबी
"वाल्मीक कराड संदर्भात अजून बरेच काही सापडणार आहे. ईडी चौकशी करणार आहे, ईडीची पूर्वीची नोटीस आहेच त्यामध्ये सगळे काही सापडेल, असंही धस म्हणाले.
'राख उचलण्यासाठी पोलिसांच्या गाड्या'
यावेळी धस यांनी पोलिसांवरही आरोप केले. राख उचलण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या स्वत:च्या गाड्या लावल्या आहेत. कोणाचे टीप्पर, जेसीबी अशी वाहन आहेत, असा आरोप धस यांनी केला.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली असून येत्या २४ तारखेला या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे. आजच्या सुनावणीत सरकारी विशेष वकिलांकडून काही कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यात देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडिओ कोर्टात दिला आहे. परंतु हा व्हिडिओ बाहेर प्रसिद्ध होऊ नये, जर झाला तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी विनंती संतोष देशमुखांच्या बाजूने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात केली.
आजच्या सुनावणीबाबत उज्ज्वल निकम यांनी म्हटलं की, न्यायालयाने आरोपींना त्यांचे म्हणणं मांडायला सांगितले आहे. येत्या २४ एप्रिलला त्यावर सुनावणी होईल. आजच्या सुनावणीत आरोपी वाल्मीक कराडची चल-अचल संपत्ती जप्त करण्यात यावी असा अर्ज कोर्टात दिला आहे. त्यावर वाल्मीककडून खुलासा दाखल करण्यात आला नाही. त्यानंतर यावर रितसर सुनावणी होईल. वाल्मीक कराडने कोर्टात अर्ज दाखल केला असून मी खूनात नाही, खंडणी मागितली नाही. मी कसा निर्दोष आहे असा केविलवाणा प्रयत्न केला आहे असं दिसून येते असंही निकम यांनी सांगितले.