मंत्रिमंडळ विस्तार लांबणार? आधी नावांची निवड, मग तीन पक्षांच्या नेत्यांची चर्चा; नंतर येईल दिल्लीकडून मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 06:16 IST2024-12-08T06:16:27+5:302024-12-08T06:16:49+5:30

विधिमंडळाचे नागपुरातील हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले होते.

Maharashtra Politics: Cabinet expansion will be delayed? First the selection of names, then the discussion of the leaders of the three parties; Later will come approval from Delhi | मंत्रिमंडळ विस्तार लांबणार? आधी नावांची निवड, मग तीन पक्षांच्या नेत्यांची चर्चा; नंतर येईल दिल्लीकडून मंजुरी

मंत्रिमंडळ विस्तार लांबणार? आधी नावांची निवड, मग तीन पक्षांच्या नेत्यांची चर्चा; नंतर येईल दिल्लीकडून मंजुरी

- यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ११ किंवा १२ डिसेंबरला होणार असे महायुतीचे नेते सांगत असले तरी हा विस्तार १४ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापली नावे निश्चित करणे, नंतर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांमधील त्याबाबतची चर्चा आणि दिल्लीकडून मंजुरी या प्रक्रियेमुळे विलंब होईल, असे सध्याचे चित्र आहे. 

विधिमंडळाचे नागपुरातील हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले होते. शिंदेसेनेचे नेते आमदार भरत गोगावले, आ. संजय शिरसाट यांनी विस्तार ११ किंवा १२ डिसेंबरला होईल, अशी माहिती माध्यमांना दिली होती. 

मात्र, खात्रीलायक सूत्रांनी सांगितले, की या दोन्ही दिवशी शपथविधी होण्याची शक्यता कमी आहे. विधानसभेचे अधिवेशन ९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर एक दिवस मध्ये जाऊन लगेच ११ तारखेला विस्तार करणे शक्य नसेल. मुख्यमंत्री फडणवीस हे १२ डिसेंबरला दिवसभर नागपुरात असतील. त्यामुळेच १४ तारखेला मुंबईत किंवा तेही शक्य झाले नाही तर अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे १५ डिसेंबरला नागपुरात नवीन मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. 

कोणाला किती मिळणार मंत्रिपदे?
कोणाला किती मंत्रिपदे आणि कोणती खाती यावर अंतिम निर्णय झालेला नाही. भाजपला २२, शिंदेसेनेला १२ आणि अजित पवार गटाला ९ मंत्रिपदे दिली जाऊ शकतात.
विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिपद दिले जाणार नाही, याबाबत तिन्ही पक्षांमध्ये सध्या तरी एकमत आहे. मात्र, एक-दोन वजनदार विधान परिषद सदस्यांबाबत ऐनवेळी अपवाद केला जाऊ शकतो. जुन्या मंत्र्यांपैकी एका-दोघांना धक्का दिला जाऊ शकतो. 

घटक पक्षांच्या नावांवरही भाजप नेतृत्वाशी चर्चा
वादग्रस्त चेहऱ्यांना मंत्रिमंडळात घेऊ नये, असा भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाचा आग्रह असल्याचे म्हटले जाते.
भाजपच्या मंत्र्यांच्या नावांना फडणवीस हे दिल्लीतील नेतृत्वाकडून मंजुरी घेतीलच; पण अन्य दोन पक्षांची नावे अंतिम करण्यापूर्वी एकदा भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा करावी,
असे त्यांना सांगण्यात आल्याची माहिती आहे. 

ॲड. राहुल नार्वेकर विधानसभाध्यक्ष?
विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपकडून ॲड. राहुल नार्वेकर यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Maharashtra Politics: Cabinet expansion will be delayed? First the selection of names, then the discussion of the leaders of the three parties; Later will come approval from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.