Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपतींनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट; दोघांमध्ये काय चर्चा झाली? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 10:53 AM2023-01-27T10:53:18+5:302023-01-27T10:54:30+5:30
संभाजीराजे छत्रपती यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.
Sambhaji Raje Chhatrapati and KCR : संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांची भेट घेतली आहे. संभाजीराजेंनी तेलंगणात जाऊन केसीआर यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. स्वतः संभाजीराजे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करून माहिती दिली. या पोस्टमध्ये संभाजीराजेंनी चंद्रशेखर राव यांचं कौतुकही केलं आहे.
गुरुवारी(दि.26) संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची हैदराबादमधील प्रगती भवन येथे भेट घेतली. या भेटीत तेलंगणात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीदरम्यान संभाजीराजेंनी स्नेहभोजनासह विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चाही केली. या भेटीनंतर संभाजीराजे यांनी विस्तृत पोस्ट लिहून चंद्रशेखर राव यांच्या कामाचं कौतुकही केलं. तसेच, त्यांना राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा चरित्रग्रंथ भेट दिला.
संभाजीराजेंची पोस्ट
या भेटीनंतर संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात ते म्हणातात, ''तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन व विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली. राव यांनी केवळ निवडणुकीपुरती आश्वासने न देता अथवा केवळ राजकीय दृष्टिकोन ठेवून कार्य न करता जनहित व राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून व्यापक कार्य आपल्या राज्यात केले आहे. श्री राव यांनी गेल्या १४ वर्षांत तेलंगणा राज्यात विकासाची गंगा आणली आहे. त्यांचे कृषीधोरण, जनधोरण, सिंचन योजना, गरीब व वंचितांसाठी आखलेल्या विविध योजना व शिक्षण पद्धती या संपूर्ण देशासाठी मार्गदर्शन व आदर्शवत आहेत.''
''त्यांच्या या योजना व कार्यपद्धती याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. श्री राव हे केवळ आपल्या राज्यापुरते मर्यादित न राहता इतर राज्यांच्या विकासाचा व त्यामाध्यमातून संपूर्ण राष्ट्राचा विकास साधण्याचा दूरगामी दृष्टिकोन ठेवणारे अत्यंत ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आपल्या निवासस्थानी अगदी आपुलकीने आदरातिथ्य केले. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांना पूर्ण अभ्यास असून महाराजांविषयी त्यांच्या मनात अत्यंत आदरभाव जाणवला. यावेळी राव यांना राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा चरित्रग्रंथ भेट दिला,'' अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.