फडणवीस तातडीने दिल्लीला निघाले; सत्तेबाहेर राहण्याच्या दोन वर्षांपूर्वीच्या भूमिकेवर ठाम, मनात काय... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 01:25 PM2024-06-06T13:25:47+5:302024-06-06T13:33:13+5:30

Devendra Fadanvis Latest News: नागपूर विमानतळावर फडणवीसांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. कार्यकर्त्यांच्या गराड्यात फडणवीस विमानतळावर पोहोचले.

Maharashtra Politics: Devendra Fadnavis immediately left for Delhi to meet Amit Shah; Staying on the role of two years before being out of power, what in mind...  | फडणवीस तातडीने दिल्लीला निघाले; सत्तेबाहेर राहण्याच्या दोन वर्षांपूर्वीच्या भूमिकेवर ठाम, मनात काय... 

फडणवीस तातडीने दिल्लीला निघाले; सत्तेबाहेर राहण्याच्या दोन वर्षांपूर्वीच्या भूमिकेवर ठाम, मनात काय... 

महाराष्ट्रात झालेल्या भाजपच्या पर्यायाने महायुतीच्या दारुण पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती भाजपच्या नेत्यांना केली होती. यावरून फडणवीसांची मनधरणी सुरु झाली असून अनेक नेत्यांनी त्यांना राजीनामा देऊ नका, असे सांगितले आहे. तरीही फडणवीस ठाम असल्याचे वृत्त आहे. अशातच फडणवीस हे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी नागपूरहून दिल्लीला निघाले आहेत. 

नागपूर विमानतळावर फडणवीसांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. कार्यकर्त्यांच्या गराड्यात फडणवीस विमानतळावर पोहोचले. सरकारमध्ये राहण्यापेक्षा बाहेर राहण्याची भुमिका फडणवीसांनी जेव्हा शिंदेंना फोडले व सत्ता स्थापन केली तेव्हाच मांडली होती. आता लोकसभेला राज्यात मोठा पराभव झाल्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसांनी ही भुमिका घेतली आहे. तेव्हा केंद्रातून निरोप आल्याने फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते. 

 भाजपाचे राज्यातील सगळेच नेते, राजीनामा देऊ नका, म्हणून त्यांची मनधरणी करत असले, तरी स्वतः फडणवीस आपला निर्णय बदलण्याची शक्यता नसल्याचं समजतं. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाला लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची किनार नक्कीच आहे, पण विधानसभा निवडणुकीवर नजर ठेवून ते मंत्रिमंडळातून बाहेर पडू इच्छितात असे मानले जाते आहे. राज्यातील शिंदे सरकारला आणखी चार महिने राहिले. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागेल. या चार महिन्यात उपमुख्यमंत्री, गृहमंत्री राहण्यापेक्षा पक्षासाठी झोकून काम करण्याचा मानस फडणवीस यांनी पक्का केल्याचं निकटवर्तीय सांगतात.

अशातच फडणवीसांच्या या भुमिकेमुळे भाजप श्रेष्ठीदेखील टेन्शनमध्ये असून अमित शहा यांनी तातडीने फडणवीसांना दिल्लीत येऊन बोला, असा निरोप दिला आहे. आता फडणवीस उपमुख्यमंत्री राहतात की भाजपाचे पुन्हा प्रदेशाध्यक्ष होतात याची चर्चा रंगू लागली आहे. 

पत्रकार परिषदेनंतर काय झालं?
उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होऊन पक्षसंघटनेसाठी काम करण्याची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. त्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वास्तविक, पत्रकार परिषदेपूर्वी भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची एक बैठक प्रदेश कार्यालयातील वरच्या माळ्यावरील सभागृहात झाली. त्या बैठकीत फडणवीस म्हणाले की, राज्यातील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचं मी पत्रपरिषदेत जाहीर करणार आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह दोन नेत्यांनी, असं न करण्याचं मत मांडलं. पराभव काही तुमच्यामुळे झालेला नाही, ही सामूहिक जबाबदारी असते, तुम्ही एकट्याने जबाबदारी घेण्याची गरज नाही, असं त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण, फडणवीस जबाबदारी स्वीकारण्यावर ठाम राहिले. 

Web Title: Maharashtra Politics: Devendra Fadnavis immediately left for Delhi to meet Amit Shah; Staying on the role of two years before being out of power, what in mind... 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.