नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का; सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 10:13 AM2024-05-09T10:13:43+5:302024-05-09T10:14:02+5:30
नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलीय.
Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलीय. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर सलीम कुत्ता प्रकरणी अडचणीत आले होते. दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. एका पार्टीत बडगुजर हे कुत्तासोबत नाचत असल्याचे व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली होती. त्यानंतर आता बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलीय. महत्त्वाची बाब म्हणजे आदल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी एका सभेत बोलताना बडगुजरांचे नाव न घेता टीका केली होती.
सुधाकर बडगुजर यांच्यावर ऐन निवडणुकीच्या काळात तडीपारीची कारवाई करण्यात आल्याने ठाकरे गट आक्रमक झालाय. सुधाकर बडगुजर यांना पोलीस यासंदर्भातील नोटीस बजावण्यासाठी गेले होते मात्र त्यांनी ती स्विकारली नाही. बडगुजर यांनी आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच ही कारवाई झाल्याचे म्हटलं जात आहे.
बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता प्रकरणात चौकशी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर हे चर्चेत आले होते. नाशिकमध्ये बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदे गटाचे जिल्हासंपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी बडगुजर यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबीत विधान केलं होतं.
'तो कुत्तावाला कोण आहे?' असा सवाल मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान विचारला. त्यावेळी कार्यकर्त्यांमधून सुधाकर बडगुजर अशी घोषणा देण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्वानाचाही अपमान होईल असं म्हटलं. त्यानंतर कार्यकर्त्यांमधून संजय राऊत यांच्याही नावाचा उल्लेख झाला. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे सगळे लोक त्यांना पाडा असे बोलत होते. मी बोललो जाऊदे आपलं कर्तव्य आपण करु. पण नंतर मला पश्चाताप झाला. परत संधी येईलच. ते नगरसेवक तरी होऊ शकतात का? असा सवाल विचारला.