Maharashtra Politics: जळगावला गुलाबराव पाटील, औरंगाबादला भुमरे; अखेर शिंदे-फडणवीस सरकारचे पालकमंत्री ठरले!

By यदू जोशी | Published: September 24, 2022 07:27 PM2022-09-24T19:27:26+5:302022-09-24T19:28:28+5:30

पालकमंत्र्यांची नावे थोड्याच वेळात जाहीर होणार

Maharashtra Politics Districts Guardian Ministers names will be out soon Sandipan Bhumre Aurangabad Gulabrao Patil Jalgaon check the list | Maharashtra Politics: जळगावला गुलाबराव पाटील, औरंगाबादला भुमरे; अखेर शिंदे-फडणवीस सरकारचे पालकमंत्री ठरले!

Maharashtra Politics: जळगावला गुलाबराव पाटील, औरंगाबादला भुमरे; अखेर शिंदे-फडणवीस सरकारचे पालकमंत्री ठरले!

googlenewsNext

यदु जोशी | लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेले तब्बल दीड महिना लटकलेली पालकमंत्र्यांची नियुक्ती थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. नागपूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे - चंद्रकांत पाटील, जळगाव - गुलाबराव पाटील, औरंगाबाद - संदीपान भुमरे, नाशिक - गिरीश महाजन असे पालकमंत्री निश्चित झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ३० जूनला घेतली होती. ९ ऑगस्टला भाजपच्या ९ तर शिंदे गटाच्या ९ कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. तेव्हापासून पालकमंत्रीच नियुक्त न झाल्याने अनेक अडचणी येत आहेत. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकी नाहीत, पालकमंत्र्यांच्या अखत्यारित येणारे निर्णयही होवू शकलेले नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे पालकमंत्रीच नसल्याने सरकार स्थिर नसल्याची मोठ्या प्रमाणात भावना होती.

देवेंद्र फडणवीस नागपूर, चंद्रकांत पाटील पुणे

देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार अशी चर्चा होती पण ते नागपूरचेच पालकमंत्री असतील.पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे असेल, अशी माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे आहेत. त्याच जिल्ह्यात भाजपचे रविंद्र चव्हाण मंत्री आहेत. मुख्यमंत्री सहसा पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवत नाहीत पण याला काही अपवाददेखील आहेत. नारायण राणे यांनी सिंधुदुर्गचे तर विलासराव देशमुख यांनी काही काळ लातूरचे पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवले होते. शिंदे यांनी ठाण्याचे पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवायचे की चव्हाण यांना द्यायचे हा निर्णय सर्वस्वी त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे.

सध्या मुख्यमंत्र्यांसह  २० मंत्री आहेत. त्यामुळे एकेका बहुतेक मंत्र्यांकडे दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिले जाईल. मात्र, विस्तारानंतर पालकमंत्रीपदांचे पुन्हा वाटप केले जाणार आहे.

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली (नियोजन मंत्री देखील)
  • राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
  • सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर,गोंदिया
  • चंद्रकांत पाटील- पुणे
  • विजयकुमार गावित- नंदुरबार
  • गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड
  • गुलाबराव पाटील - जळगाव, बुलढाणा
  • दादा भुसे- नाशिक, 
  • संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
  • सुरेश खाडे- सांगली
  • संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
  • उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
  • तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद(धाराशिव)
  • रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग
  • अब्दुल सत्तार- हिंगोली
  • दीपक केसरकर- मुंबई शहर, कोल्हापूर
  • अतुल सावे- जालना, बीड
  • शंभूराज देसाई- सातारा, ठाणे
  • मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

 

भुमरेंकडे औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यातील संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार (शिंदे गट) आणि अतुल सावे (भाजप) असे तीन मंत्री आहेत. पालकमंत्रीपद भुमरे यांना दिले जाणार आहे. विधानसभेचे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच आमदार हे शिंदे गटात आहेत. भुमरे यांना सत्तार यांच्या तुलनेने कमी महत्त्वाचे खाते दिले गेले. त्याची भरपाई त्यांना पालकमंत्रीपद देवून केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

Web Title: Maharashtra Politics Districts Guardian Ministers names will be out soon Sandipan Bhumre Aurangabad Gulabrao Patil Jalgaon check the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.