Maharashtra Politics : 'महाराष्ट्राची संस्कृती आम्हाला शिकवू नका...', पोटनिवणुकीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 02:52 PM2023-01-25T14:52:12+5:302023-01-25T14:52:50+5:30
Maharashtra Politics : 26 फेब्रुवारी रोजी कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे.
Maharashtra Politics : पुढील महिन्यात राज्यात दोन मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत. पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघातील भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या अकाली निधनानंतर या दोन्ही जागांवर पोटनिवडणुक होणार आहेत. या दोन्ही ठिकामी बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
या दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केले आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार, जयंत पाटील आणि सुनील तटकरे मातोश्रीवर आले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आहे. महाविकास आघाडीने ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी,' असे आमचे मत आहे.
आम्हाला शिकवू नये...
एकनाथ शिंदेंच्या आवाहनावर राऊत म्हणाले की, 'महाराष्ट्राची संस्कृती-परंपरा काय आहे, हे आम्हाला शिकवू नये. राज्यात परंपरेची रोज पायमल्ली होते, हे वेगळं सांगायला नको. पंढरपूर आणि नांदेड पोटनिवडणुकीत ही संस्कृती दिसली नाही. फक्त अंधेरीची निवडणूक बिनविरोध झाली. त्याची कारणं वेगळी आहेत, तिथं भाजपला जिंकण्याची संधी नव्हती,' असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.