“आमची पानं इतिहासात..,” सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निर्णयाबाबत सत्तारांचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 11:51 PM2023-05-04T23:51:01+5:302023-05-04T23:51:47+5:30
राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे, या निर्णयाबाबत बोलताना सत्तारांनी मोठं वक्तव्य केलं.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रेच्या कारवाईचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. या प्रकरणाची आता सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे. महाराष्ट्रातील या सत्तासंघर्षावर पुढील काही दिवसांमध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे. आता यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठं वक्तव्य केलंय.
“कॅप्टनच गेले तर बाकी काही पाहण्याचा प्रश्नच नसतो. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांमध्ये मीदेखील आहे. प्लॅन बी असो किंवा प्लॅन सी असो ज्याला राजकारण करायचंय तो त्याचे प्लॅन बांधत असतो. प्लॅन प्रमाणे चालतंय किंवा नाही चालत हे मी आता सांगणं उचित होणार नाही,” असं अब्दुल सत्तार म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर वक्तव्य केलं.
“सन्माननीय सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांना मान्य राहिल. आम्ही राहिलो तरी इतिहास राहणार आणि आम्ही गेलो तरी इतिहास राहणार. आमची पानं इतिहासात लिहिण्यासारखी राहतील. हा निर्णय देशासाठी लागू होईल. सर्वोच्च न्यायलय देशाचा सुप्रिमो आहे, त्यांनी दिलेला निर्णय आम्ही हसत खेळत मान्य करू,” असंही त्यांनी नमूद केलं.