एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, 'आमची स्ट्रॅटजी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:07 AM2024-05-20T11:07:36+5:302024-05-20T11:11:19+5:30

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

Maharashtra Politics Eknath Shinde CM again we will be with that decision says Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, 'आमची स्ट्रॅटजी...'

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? फडणवीस म्हणाले, 'आमची स्ट्रॅटजी...'

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, राज्यात मुख्यमंत्रीपदावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. एकीकडे मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा उद्धव ठाकरे यांच्या मनात पूर्वीपासूनच होती असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. तर बहुमत असतानाही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री  होता आला नाही असा आरोप विरोधकांकडून होत आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याने फडणवीस नाराज झाल्याची चर्चा देखील सुरु होती. मात्र आता शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री केलं, तरी आम्ही त्या निर्णयासोबत असू असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचे घटक पक्ष एकत्रित निवडणूक लढतील आणि त्यात भाजप मोठ्या भावाची भूमिका बजावेल, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर आता लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. 

"याबद्दल स्पष्टता केली जाऊ शकते किंवा केलीही जाणार नाही. मी यामुळे म्हणतोय की, भाजपची स्ट्रॅटजी आहे. आसाम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात आपण बघितलं आहे. भाजप विधानसभेची निवडणूक अनेकदा बिनचेहऱ्याची लढते. अनेकदा चेहरा देऊन लढते. याचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेते," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"भाजप सर्वात मोठा पक्ष आहे आणि सर्वात मोठा पक्ष राहणार आहे. महायुतीतही सर्वात मोठा पक्ष राहणार आहे. पण, याचा अर्थ असा नाही की, सर्वात मोठा पक्ष आहे म्हणून आमचाच मुख्यमंत्री बनेल. मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय आमच्या सोबतच्या पक्षासोबत चर्चा करून आणि आमचे केंद्रीय नेतृत्व घेईल. आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तरी आम्ही त्या निर्णयासोबत असू", असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

नाराज होऊन उपमुख्यमंत्री पदाची ऑफर स्विकारली - देवेंद्र फडणवीस

"पक्षाने माझं म्हणणं ऐकलं. पण, शपथविधी सोहळ्याच्या आधी अमित शाह आणि नंतर पंतप्रधान मोदी यांनी मला फोन केला आणि उपमुख्यमंत्री होण्याची विनंती केली. त्यानंतर नाराज होऊन ही ऑफर स्वीकारली. जेव्हा मोदींनी याबद्दल ट्विट केले, तेव्हा मला देशभरातली कार्यकर्ते आणि नेत्यांचे फोन आले. ज्या प्रकारचा त्याग आपण केलात, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे," असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Maharashtra Politics Eknath Shinde CM again we will be with that decision says Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.